आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किम करदाशियांच्या कुटुंबातच नाट्यमयता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्स्टाग्रामवर ३५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले करदाशियां-जेनरचे कुटुंब एक आठवड्यापासून गप्प आहे. किम करदाशियांच्या कुटुंबाच्या या चुप्पीला संशय आणि नाट्यमयता याच्याशी जोडले जात आहे. गेल्या रविवारी पॅरिसच्या डे पोर्टालेस या हॉटेलच्या खासगी मॅन्शनमध्ये किमला लुटण्यात आले, हा प्रकार एखाद्या स्क्रिप्टचा भाग तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या लुटीत किमला २० कॅरेटच्या दुर्मिळ एमराल्ड कट हिऱ्याच्या अंगठीसह १० दशलक्ष डॉलरचे दागिने गमवावे लागले. अंगठीची किंमतच चार दशलक्ष आहे. ही अंगठी गायक पती कान्ये वेस्टने तिला एक महिन्यापूर्वीच भेट म्हणून दिली होती.

गेल्या गुरुवारी किम करदाशियांने इन्स्टाग्रामवर आपले छायाचित्र पोस्ट केले होते. त्यात ही अंगठीही दिसत होती. घटनेनंतर किम आपल्या खासगी विमानाने न्यूयॉर्कला रवाना झाली. सोशल मीडियावर ओव्हर एक्स्पोजर हेही लुटीचे एक कारण मानले जात आहे. किम करदाशियांच्या फॉलोअर्सची इन्स्टाग्रामवरील संख्या ८.४ कोटींपेक्षा जास्त आहे. ट्विटरवर तिचे ४.८३ कोटी फॉलोअर्स आहेत. म्हणजे एकूण १३.२८ कोटी लोक तिला फॉलो करतात. पॅरिस पोलिसांच्या मते लुटारू किम करदाशियांला सोशल मीडियावर फॉलो करत होते. तिच्या क्षणा-क्षणाच्या हालचालींची त्यांना माहिती होती. इन्स्टाग्रामवर अंगठीचा फोटो टाकणे महागात पडले, असे किमलाही वाटते.

लोकप्रियतेच्या या उंचीवर पोहोचण्याची किमची कहाणी खूप रंजक आहे. लॉस एंजलिसच्या ऑल गर्ल्स कॅथॉलिक स्कूलमध्ये किमचे शिक्षण झाले. शाळेच्या दिवसांतच वडील रॉबर्ट करदाशियां यांनी तिला कार दिली होती. एका मुलाखतीत किमने सांगितले होते की ती कार मिळण्यापूर्वी तिला काही अटी मान्य कराव्या लागल्या. अटींचा भावार्थ असा होता की, किमला आठवड्यात किमान एकदा स्वत: कार धुवावी लागेल. कारमध्ये नेहमी गॅस भरलेला असावा. अभ्यास चांगला करावा लागेल. कारचा अपघात झाला तर दुरुस्तीचा खर्च स्वत: करावा लागेल. पण सहा महिन्यांतच किमने धडक दिली आणि कार दुरुस्त करण्यासाठी तिला एका कपड्याच्या दुकानात काम करावे लागले. अशी झाली तिच्या कारकीर्दीची सुरुवात. नाइलाजाने करावी लागलेली ही नोकरी तिला आवडली. तिने ती पुढेही सुरू ठेवली. नंतर तिने अॅसेसरी डिझाइन करणे सुरू केले. तिचे हँडबँड लोकप्रिय झाले, तिने ते लॉस एंजलिसच्या दुकानांत विकण्यास सुरुवात केली.
त्याच वेळी आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि हे कुटुंब प्रथमच टीव्हीच्या प्रकाशझोतात आले.

किमला तेव्हा एमटीव्हीचा ‘द रिअल वर्ल्ड’ हा रिअॅलिटी शो खूप आवडायचा. तिलाही असेच काहीतरी करण्याची इच्छा होती. आई-वडिलांच्या घटस्फोटामुळे कुटुंब प्रकाशझोतात आल्याने तिला बरेच वाटले. पॅरिस हिल्टन तिची शालेय मैत्रीण होती. किमची टीव्हीवरील सुरुवात पॅरिसच्या ‘सिंपल लाइफ अॅज हिल्टन’या शोमध्ये तिची सहायक आणि स्टाइलिस्टच्या कॅमियो रोलने झाली होती. पॅरिस सेक्स टेप लीकमुळे लोकप्रिय झाली होती. नंतर किमचीही तिचा बॉयफ्रेंड रे जेसोबतची टेप लीक झाली तेव्हा ते जाणूनबुजून करण्यात आले असे म्हटले गेले. किम आणि तिच्या आईने मात्र ते फेटाळले. पण किम करदाशियांची लोकप्रियता पॅरिस हिल्टनपेक्षाही वाढली. लीक टेपमुळे ती स्टार बनण्याची सुरुवात झाली. किमबाबत मीडियाने मोठा हाइप निर्माण केला. या हाइपसह कुटुंबाचा ‘कीपिंग अप विथ करदाशियन्स’ हा टीव्ही शो ई नेटवर्क्सवर २००७ मध्ये सुरू झाला, पण असे शो नाट्यमय घटनांशिवाय पुढे सुरू राहू शकत नाहीत.

हा शो करदाशियां आणि जेनर कुटुंबाच्या गोंधळावर चालतो. त्यात किम करदाशियांव्यतिरिक्त तिच्या कर्टनी, खोले या बहिणी आणि रॉब हा भाऊ आहे. हे चौघे रॉबर्ट करदाशियां आणि आई क्रिसची अपत्ये आहेत. किमची आई क्रिसने रॉबर्ट करदाशियांला घटस्फोट दिल्यानंतर ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता ब्रुस जेनरशी लग्न केले होते. ब्रुसची आधीची चार अपत्ये होती. अशा प्रकारे करदाशियां-जेनर भाऊ-बहिणींची संख्या आठ झाली. नंतर ब्रुस आणि क्रिस जेनर यांना दोन मुले झाली. त्यामुळे भाऊ-बहिणींची संख्या १० झाली. हे सर्व जण ‘कीपिंग अप विथ करदाशियन्स’मध्ये असतात. त्याशिवाय अधूनमधून त्यांचे मित्रही येतात. शोमध्येच खोले करदाशियांचे लग्न झाले. कर्टनी गर्भवती झाली. मग किमनेही बास्केटबॉल खेळाडू ख्रिस हॅमशायरशी शोमध्येच लग्न केले. तीन महिन्यांतच दोघांचा घटस्फोटही झाला. ख्रिस हॅमशायरने किमवर फसवणुकीचा आरोप लावला. हे किमचे दुसरे लग्न होते. त्याआधी किमने संगीत दिग्दर्शक डेमॉन थॉमसशी २००० मध्ये लग्न केले होते. त्यांच्यात २००४ मध्ये घटस्फोट झाला होता. या वर्षी मेपासून शोचे २० वे सत्र सुरू झाले असून ते सध्या सुरू आहे.

किमला लुटण्यात आले तेव्हापासून शोचे चित्रीकरण बंद आहे. करदाशियां घराण्यात सर्वात लोकप्रिय किम हीच आहे. हायस्कूलपर्यंत शिकलेली किम फोर्ब्जच्या ‘सर्वाधिक उत्पन्न असलेल्या सेलिब्रिटीज’च्या २०१६ च्या यादीत ४२ व्या स्थानी आहे. तिची कमाई ५१ दशलक्ष डॉलर दाखवण्यात आली आहे. रिअॅलिटी टीव्हीची मोस्ट-फॉलोड किमचा नवा शो आहे- टेक आंत्रप्रेन्योर. तिच्या किम करदाशियां : हॉलीवूड मोबाइल गेमने २०१५ मध्ये ७१.८ दशलक्ष डॉलर मिळवले. किमच्या कमाईचा सुमारे ४० टक्के भाग त्यातूनच येतो. तिच्या किमोजी अॅपद्वारे तिला १.९९ दशलक्ष डॉलर आणि सबस्क्रिप्शन बेस्ड पर्सनल अॅपद्वारे २.९९ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळते. कर्टनी आणि खोले या दोन बहिणींसोबत ती ‘डॅश’ ही कपड्यांच्या दुकानांची चेन चालवते.

लुटीच्या घटनेनंतर कान्ये वेस्टने पत्नी किम करदाशियांच्या सुरक्षेसाठी तिच्यासारख्या तीन मुलींना नोकरीवर ठेवले आहे. त्याने किमची सुरक्षा वाढवण्यावर ६ दशलक्ष पौंड खर्च केले आहेत. व्हाइट हाऊसमध्ये काम केलेल्या एका ऑनलाइन सुरक्षा पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. हे पथक सोशल मीडिया लिक्सला तोंड देईल. लुटीच्या घटनेनंतर कान्ये वेस्टने किमला शो सोडण्यास सांगितले, असेही म्हटले जात आहे.
‘भास्कर’शी करारबद्ध द न्यूयॉर्क टाइम्स आणि टाइम नियतकालिकातून इनपुट
बातम्या आणखी आहेत...