आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेटचा सामना करण्याआधीच कामगारमंत्र्याने घेतली माघार, ट्रम्प यांना पुन्हा धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना अनेक झटके बसत आहेत. पदग्रहणानंतर फक्त २४ दिवसांनीच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी राजीनामा दिला. त्याला ४८ तास उलटत नाहीत तोच आता कामगारमंत्री म्हणून नियुक्त केलेले अँडी पजदर हे मैदान सोडून पळाले.
 
सिनेटमध्ये मान्यता मिळण्यासाठी होणाऱ्या चर्चेच्या आधीच अँडी यांनी गुरुवारी सांगितले की, माझ्या नावाशी एवढे वाद जोडण्यात आले आहेत की सिनेटमध्ये माझ्या नावाला मंजुरी मिळणे जवळपास अशक्यच आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

अँडी यांची नियुक्ती करताना ट्रम्प यांनी त्यांची बरीच स्तुती केली होती. पण त्यावेळी कामगारविरोधी असल्याचे सांगत त्यांच्या नियुक्तीला मोठा विरोध झाला होता. त्यांचे व्यावसायिक हित, त्यांचा घटस्फोट आणि व्यवसायाबाबत त्यांचे विचार यावरून देशभर त्यांच्याविरोधात वातावरण होते. कामगार हक्क संघटना त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या काही सिनेटर्सनी त्यांच्या बाजूने मत देण्यास नकार दिला होता. सिनेटमधील डेमाेक्रॅट नेते चक शूमर म्हणाले की, अँडी यांना कामगारमंत्री करू नये आणि सिनेटनेही त्यांच्या नावाला मंजुरी देऊ नये.

ट्रम्प यांना दिले होते ३,३२,००० डॉलर : अँडी हे कार्ल्स आणि हार्डीज या फास्ट फूट चेनच्या एक अब्ज डॉलरची पेरेंट कंपनी सीकेईचे मुख्य कार्यकारी होते. या कंपनीचे अमेरिका आणि जगभरात ३,७५० आउटलेट आहेत. रिपब्लिक पक्षाला मोठ्या देणग्या देणाऱ्यांत त्यांचा समावेश आहे. त्यांनी २०१२ मध्ये मिट रोम्नी यांना आणि २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मोठी रक्कम दिली होती. ट्रम्प यांना अध्यक्षपद निवडणुकीसाठी अँडी आणि त्यांच्या पत्नीने ३,३२,००० डॉलरचा (सुमारे २.२२ कोटी रुपये) निधी दिला होता.

‘हॉट मॉडेल, भुकेल्या युवकांची गरज ’
अँडी फास्ट फूड चेनचे प्रमुख होते. त्यांनी २०११ मध्ये एक निवेदन जारी केले होते. त्यात लिहिले होते की, ‘कुरूप लोक बर्गर विकू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला हॉट मॉडेल हवे आहेत. ’ कंपनीच्या एका जाहिरातीचा बचाव करताना त्यांनी म्हटले होते की, आमचे लक्ष्य भुकेले लोक आहेत. जे भुकेले युवक बनू इच्छितात अशा किशोरवयीनांची आम्हाला गरज आहे.
 
घटस्फोट, ओप्रा विनफ्रे शोचे व्हिडिओ
अँडी पजदर यांनी पत्नी फियर्सटीनला घटस्फोट दिला होता. फियर्सटीनने ओप्रा विनफ्रे शोमध्ये सांगितले होते की, अँडी मला खूप त्रास देत होते. सुमारे तीन दशकाआधी घटस्फोटाच्या अर्जातही फियर्सटीनने अॅंडी यांच्यावर मारहाणीचे आरोप लावले होते. अँडी यांनी हे आरोप खोटे असल्याचे सांगितले, पण ओप्राने व्हिडिओ सिनेट समितीकडे सोपवले.
बातम्या आणखी आहेत...