आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान दुर्घटनेत लादेनची बहीण, सावत्र आईचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - अल कायदाचा खात्मा झालेला म्होरक्या आेसामा बिन लादेनच्या कुटुंबातील काही सदस्यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना दक्षिण इंग्लंडमध्ये शुक्रवारी घडली. त्यात चार जण ठार झाले. खासगी जेटमधून लादेनची बहीण आणि सावत्र आई प्रवास करत होते.

लादेनचे काही कुटुंबीय इटलीहून फेनॉम ३०० जेटने इंग्लंडमध्ये येत होते. हॅम्पशायर येथील ब्लॅकबुश विमानतळावर हे जेट उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी एका टॉवरला धडकून खाली कोसळले . त्यात वैमानिकासह चार जणांचा मृत्यू झाला. मृतांत बहीण आणि सावत्र आईचा समावेश आहे. काही क्षणात जेटचा स्फोट झाला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जेटचे बुकिंग लादेन कुटुंबाने केले होते, असे ‘गार्डियन’च्या वृत्तात म्हटले. आहे. दरम्यान, सर्व मृतदेह सौदीला रवाना केले जातील. सौदी राजदूत प्रिन्स माेहंमद बिन नवाफ अल सौद यांनी घटनेबद्दल राजदूत कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर दु:ख व्यक्त केले. सौदी अरेबियाचे राजदूत यांनीही मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

वडिलांचाही असाच मृत्यू
लादेनचे वडील माेहंमद बिन लादेन यांचाही मृत्यू विमान दुर्घटनेत झाला होता. १९६७ मध्ये सौदी अरेबियात विमानाची दुर्घटना घडली होती.

बिन लादेनचा कुटुंब वृक्ष
>लादेनचे वडील मोहंमद मूळचे येमेनचे. १९१० मध्ये ते सौदी अरेबियात आले.
>सौदी अरेबियात ते अनेक बांधकाम प्रकल्पांचे मोठे विकासक बनले.
>मोहंमद लादेनला अनेक बायका हाेत्या. एकूण ५० मुले.
>सर्वात मोठा मुलगा सालेम बिन लादेन, १९८८ मध्ये टेक्सासमध्ये विमान दुर्घटनेत त्याचा मृत्यू.
>बिन लादेनच्या कुटुंबातील अनेक सदस्य अमेरिकेत राहतात.

अबोटाबादमध्ये कारवाई
९ / ११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अल कायदाचा म्होरक्या आेसामा बिन लादेनचा शोध घेतला. अखेर २०११ मध्ये अमेरिकी लष्कराने पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये दडून बसलेल्या लादेनवर धडक कारवाई करून त्याचा खात्मा केला होता.

मालकीची विमान फर्म
लादेनची बहीण आणि सावत्र आई सौदीत राहतात. लादेन कुटुंबाच्या मालकीची विमान फर्म असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कशासाठी ब्रिटनमध्ये ?
लादेनचे कुटुंबीय खासगी जेटने ब्रिटनमध्ये काय करत होते, हे मात्र तत्काळ समजू शकलेले नाही.

जलालुद्दीन हक्कानी जिवंत
काबूल | मुल्ला आेमरच्या मृत्यूची पुष्टी दिल्यानंतर दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कने म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीच्या मृत्यूची बातमी फेटाळून लावली आहे. जलालुद्दीन हक्कानी अगोदर आजारी होता, परंतु नंतर तो तंदुरुस्त झाला आहे, असा दावा तालिबानकडून करण्यात आला. जलालुद्दीन हक्कानी वयाच्या सत्तरीत आहे. आेमरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानीला तालिबानचा दुसऱ्या क्रमांकाचा म्हाेरक्या बनवण्यात आले आहे. अमेरिकेने दोन्ही बापलेकास अाधीच आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे.