आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांचा टीव्हीवर राजीनामा, विरोधी गटाशी वाटाघाटी सुरू असताना निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्रिपोली- आंतरराष्ट्रीय समुदायाचा पाठिंबा असलेले लिबियाचे पंतप्रधान अब्दुल्ला अल थानी यांनी बुधवारी टीव्हीवरील लाइव्ह कार्यक्रमातून पदाचा राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. देशातील अस्थिर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बंडखोरांसोबतच्या बैठकीनंतर ही घटना घडली.
टीव्हीवरील टॉक शोदरम्यान थानी यांनी पदाचा राजीनामा जाहीर करून टाकला. देशात मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यात सरकारला अपयश आले आहे. अद्यापही अनेक भागात वीज नसल्यामुळे संतापाची भावना आहे. त्यावरून जनतेने थानी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. ते ऐकून थानी चांगलेच बिथरले. सरकारमधून मी बाहेर पडणे हाच सर्व समस्यांवरील तोडगा असेल तर मी याच ठिकाणी राजीनामा जाहीर करतो. माझा आैपचारिक राजीनामा रविवारी संसदेत दाखल करन, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे ऐकून अँकरसह सर्वांनाच धक्का बसला. दरम्यान, मे महिन्यात पंतप्रधान थानी यांच्या कारवर काही बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यात सुदैवाने ते बचावले होते.
तडकाफडकी निर्णयामुळे देशातील अस्थैर्यात भर
संयुक्त राष्ट्राकडून तडजोडीचे प्रयत्न
संयुक्त राष्ट्राने देशातील राजकीय स्थैर्यासाठी पुढाकार घेत विरोधी गटाच्या नेत्यांसमवेत चर्चेस सुरुवात केली होती. मंगळवारी दोन विरोधी गटांसोबत ही चर्चा जीनिव्हात सुरू झाली होती. विरोधकांचे समर्थन मिळवून विद्यमान थानी सरकारला स्थिर करण्याचा प्रयत्न होता. परंतु आता त्याला खीळ बसणार आहे. सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांची आमसभा आहे. त्याअगोदर बंडखोर आणि सरकार यांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे विशेष प्रतिनिधी बर्नार्डिनो लिआॅन म्हणाले.
गद्दाफींनंतर अस्थिर ,
अतिरेक्यांचाही डोळा
२०११ मध्ये मुअम्मर गद्दाफी यांच्याविरोधात देशात बंड झाले. गद्दाफी यांना सत्ता सोडून पळून
जावे लागले होते. त्यानंतर दहशतवादी संघटना देशाच्या संपत्तीवर डोळा ठेवून असल्याने हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली. देशात अस्थिरता वाढली.

बेंगाझीवरून संघर्ष
लिबियाच्या पूर्वेकडील बेंगाझी शहर भागात दररोज लढाई सुरू आहे. सरकारी फौजा आणि बंडखोर सैनिकांत चकमक सुरू असते. दोन्ही बाजूंनी त्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याशिवाय पूर्वेकडील बंदराचे शहर टॉब्रुकचाही वाद आहे. तेथे वादग्रस्त लष्करप्रमुख खलिफा हाफतार यांनी सैनिक तैनात केले आहेत. हाफतार यांची नेमणूक या वर्षी मार्चमध्ये झाली होती. ही नेमणूक बेकायदा असल्याचा आरोप आहे.