आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

130 वर्षांनंतर महिलेने ग्रंथालयाचे पुस्तक परत केले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- आजोबांनी शाळेच्या ग्रंथालयातून घेतलेले पुस्तक नातीने १३० वर्षांनंतर परत केले. या महिलेने क्षमा मागण्यासाठी ग्रंथालयाला पत्र लिहिले. तुमच्या माजी विद्यार्थ्याने हे पुस्तक गहाळ केले होते. त्यांच्या वतीने मी क्षमा मागते. हे पुस्तक परत करत आहे, असे तिने आपल्या पत्रातून कळवले.

अॅलीस जिलेट असे या महिलेचे नाव असून ती ७७ वर्षांची आहे. ‘द मायक्रोस्कोप अँड इट््स रेव्हेलेशन्स’ हे डॉ. विल्यम बी. कार्पेंटर लिखित पुस्तक तिच्या आजोबांनी ग्रंथालयातून घेतले होते. सोमरसेट येथील आपल्या जुन्या घराची सफाई करताना तिला हे पुस्तक सापडल्याचे स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. १००० पानांचे हे पुस्तक तिच्या आजोबांनी हिअरफोर्ट कॅथड्रल स्कूलमधून घेतले होते. ते १८८६ ते १८९४ दरम्यान या शाळेत विद्यार्थी होते. ते प्रथितयश निसर्गतज्ज्ञ आणि पॅथॉलॉजिस्ट होते.

जिलेटने माफीपत्रासह शाळेला पुस्तक परत केले. हे पुस्तक दुर्मिळ असल्याचे वाटल्याने आपण ते त्वरित परत केल्याचे तिने सांगितले. शाळेचे यामुळे त्या वेळी मोठे नुकसान झाले असावे, अशी खंतही अॅलीस जिलेटने व्यक्त केली.

नातीकडून दंड घेणार नाही
ए.ई. बॉयकॉट यांनी हे पुस्तक ग्रंथालयातून घेतले होते. मात्र त्यांच्या नातीकडून शाळा दंड वसूल करणार नाही असा खुलासा शाळेने केला. शाळेने दंड आकारला असता तर जिलेट यांना ७,४४६ पाउंड(६ लाख ३६ हजार रुपये) इतका दंड भरावा लागला असता. पुस्तक चांगल्या स्थितीत असल्याने शाळेने आनंद व्यक्त केला.

त्यांच्या खिशात असत गोगलगाय
आपले आजोबा ए.ई. बॉयकॉट यांना निसर्ग इतिहास वाचनाचा प्रचंड छंद होता. त्यांना गोगलगाईंविषयी मोठे कुतूहल होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी त्यांचा पहिला शोधनिबंध सादर केला होता. तो गोगलगाईंच्या प्रजातींविषयी होता. हिअरफोर्डशायर येथील प्रजातींवर त्यांनी पहिले संशोधन केले होते असे अॅलीस यांनी सांगितले. वनस्पती निरीक्षणासाठी ते शेकडो मैल भटकंती करत. त्यांच्या खिशात नेहमी गोगलगाय असत असे आजीने सांगितले होते.
बातम्या आणखी आहेत...