आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ: रुग्णालयात मृतदेहांचा खच, व्यापक मदतकार्य, नि:शुल्क विमान सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे- नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपपीडितांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांकडून व्यापक स्तरावरील मदतकार्य अभियान राबवले जाईल, असे आश्वासन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी दिले.

मून म्हणाले की, नेपाळमधील संकट मन हेलावून टाकणारे आहे. अद्यापही तेथील विनाशाचे वृत्त कानी पडत आहे आणि मृतांचा आकडा वाढतच आहे. नेपाळच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय शोधमोहीम तसेच मदतनिधीच्या माध्यमातून नेपाळ सरकारशी समन्वय साधण्यास संयुक्त राष्ट्रे तत्पर आहे आणि व्यापक बचावकार्य हातीही घेतले आहे.

रुग्णालयात मृतदेहांचा खच
काठमांडूच्या खोऱ्यातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. रुग्णालयात मृतदेह ठेवायला जागा अपुरी पडत आहे आणि संकटकालीन सेवा देण्यातही डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबत संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या विभागीय कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, नेपाळच्या पूर्वोत्तर भागात इतर भागांइतके नुकसान झालेले नाही. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अध्यक्ष सॅम कुतेसा यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या कोशागार विभागाचे कार्यकारी संचालक बाबातुंदे ओसोतिमेहिन यांनी भूकंप पीडितांप्रति तीव्र सहानुभूती व्यक्त करत या घटनेमुळे धक्का बसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, नेपाळच्या लोकांना आणि सरकारला मदत उपलब्ध करून देण्यासाठी यूएनएफपीए आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रयत्न करेल. भूकंपाच्या तडाख्यात सापडलेल्या गर्भवती महिलांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून अशा महिलांना आणि त्यांच्या बालकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल.

कंपन्यांची नि:शुल्क विमान सेवा
नवी दिल्ली- नेपाळमधील भूकंपामुळे हादरलेल्या विमान कंपन्यांनी मानवतेचे दर्शन देत नेपाळमध्ये आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी नि:शुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
यात एअर इंडिया, स्पाइसजेट, इंडिगो आणि जेट एअरवेज या कंपन्यांचा समावेश आहे. एअर इंडियाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारपासून दिल्ली आणि कोलकात्यातून नियमित उड्डाणास पुन्हा प्रारंभ होईल. शिवाय, आवश्यक ती सामग्री नेण्यासाठी या दोन्ही शहरांमधून प्रत्येकी एक विशेष उड्डाणही केले जाईल परतीच्या मार्गात त्या विमानात नेपाळमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना आणले जाईल.

एअर इंडियाने काठमांडूला जाण्यासाठी आणि तेथून परतण्यासाठी दोन मेपर्यंतच्या तिकिटांचे रद्दबातल आणि परतावा शुल्क माफ केले आहे. दरम्यान, स्पाइसजेटने दिल्ली ते काठमांडू मार्गावरील दोन उड्डाणे रद्द केली होती. मात्र, कंपनीच्या निर्णयानुसार आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत आणि अतिरिक्त मदत उड्डाणांची त्यांची तयारी आहे.

गुगल अधिकाऱ्याचा कॅम्पमध्ये मृत्यू
काठमांडू- नेपाळमध्ये शनिवारी आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे उद्‍भवलेल्या हिमवादळात माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये मारल्या गेलेल्या 10 लोकांमध्ये गुगलच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश होता.
डॅन फ्रॅडिनबर्ग असे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. गुगलचे अन्य एक अधिकारी लॉरेन्स यू यांनी ब्लॉगवर म्हटल्याप्रमाणे, फ्रेडिनबर्ग यांच्यासह गुगलचे तीन अन्य कर्मचारीही एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेले होते. दरम्यान, गुगलने येथील बचाव कार्यासाठी १० लाख डॉलरची मदत दिली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रांतून पाहा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...