आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Louis Jordan Lost At Sea For 66 Days Survived On Fish And Rainwater

दिव्य मराठी विशेष - समुद्रात मोडक्या बोटीवर काढले ६६ दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी (अमेरिका) - उत्तर कॅरोलिनाच्या लुईस जॉर्डनची कहाणी ‘लाइफ ऑफ पाय’ सिनेमासारखीच. लुईस २३ जानेवारीला बोट घेऊन समुद्र सफारीवर निघाले. पण घरी परतण्यासाठी त्यांना ६६ दिवस लागले. पावसाचे पाणी, कच्चे मासे व तुटकी नौका यांच्या आधारावर दोन महिन्यांहून जास्त काळ त्यांच्या आयुष्याची दोरी तग धरून राहिली. गेल्या गुरुवारी उत्तर कॅरोलिनापासून ३२२ किमीवरून जाणाऱ्या कार्गो जहाजाच्या मदतीने जॉर्डनने किनारा गाठला. या ६६ दिवसांची कहाणी लुईसच्याच शब्दांत...
मी २३ जानेवारीला कॉनवेच्या बकस्पोर्ट बंदरावर माझ्या एंजल या बोटीवर बसलो होतो. मासेमारीला जावे, असा विचार मनात आला. मी यापूर्वी कधीही खोलवर समुद्रात गेलो नव्हतो. १९५० मध्ये निर्मित एंजल या ३५ फुटांच्या बोटीतून मी निघालो. समुद्र शांत होता. मी पुढे गेलो आणि मासेमारी करायला लागलो. २९ जानेवारीपर्यंत सर्व ठीक होते. ३० च्या रात्री मी हवेत तरंगत होतो. मी केबिनच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत हवेत उसळी घेत होतो.
तुफानी लाटांमुळे माझी बोट उलटली होती. असे तीन वेळा घडले. बोट वरून तुटली व बुडायला लागली. मी कसातरी बोटीच्या बेसमेंटमध्ये गेलो. माझा जीपीएस, रेडिओ सिस्टिम सर्वकाही पाण्यात बुडाले होते. बोट सरळ करण्याचा प्रयत्न केला, पण लाटांपुढे मी हरलो. मग मी स्वत:ला समुद्राच्या भरवशावर सोडून दिले.
मदतीच्या आशेने मी उलटलेल्या बोटीवर बसून राहिलो. वाचण्याची आशा नव्हती. आई-वडील रडत असतील, आतापर्यंत तर माझा मृत्यू झाला असावा असे त्यांना वाटत असेल, असे विचार मनात यायला लागले. मी प्रार्थना करत होतो. खाण्याचे पदार्थ संपत आले होते. छोटे मासे पकडणे शिकलो. ते कच्चेच खावे लागत होते.
पावसाचे पाणी हाच तहानेवरील एकमेव उपाय होता. पाऊसधारा ओंजळीत घेऊन ते पाणी पीत असे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ असा घालवल्यानंतर ते जर्मन कार्गो जहाज देवदूतासारखे गुरुवारी तेथे आले. मी संपूर्ण ताकद लावून दोन्ही हात हलवले. मी दिसल्याने क्रू मेंबर्सनी छोटी नाव टाकून मला जहाजावर घेतले. तटरक्षक दलाचे पथक तिथे आले. ते देवदूतच होते. त्यांच्यामुळेच आज कुटुंबासोबत आहे.