लंडन - प्रिय कॅटी हॉपकिन्स,
मी तुला पत्र लिहीत आहे. आदरातून नव्हे, तर तुला रोखण्यासाठी हे नम्रतापूर्वक निवेदन आहे.
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एडवर्ड मिलिबँडसंबंधी तू व्यक्त केलेले विचार वाचण्यात आले. हे विचार स्पेक्ट्रमवरील वाटले. मी अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौ-यावरून परतले. वडील स्टीफन हॉकिंग यांच्या एका शोमध्ये प्रेझेंटर म्हणून मी तेथे गेले होते. (माझ्या वडिलांना तू आेळखत असशीलच. त्यांचा परिचय देण्याची तर गरज वाटत नाही.) सिडनीच्या ऑपेरा हाऊसमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा लाइव्ह शो होता. खरे तर माझ्या वडिलांची व्याधी अनुभवल्यामुळे दुर्बलांबद्दलचा माझा दृष्टिकोनच बदलून गेलेला होता. ही गोष्ट १९७० ची आहे. मी लहान होते. आम्ही दोघे यावर खुलेपणाने बोलत असू. बाहेर असलो तरी आमची चर्चा होत असे. आम्हाला अनेकदा बिकट परिस्थितीचा मुकाबला करावा लागला.
एकदा रेस्तराँमध्ये तेथील व्यवस्थापकाने लंच पूर्ण होण्याअगोदरच तेथून बाहेर काढले होते. आमच्याकडे पाहून इतरांना त्रास होत होता, ही त्यामागील सबब होती. तो काळ माझ्यासाठी वेगळा होता. मोठ्या माणसांमध्ये राहून मलाच अकाली प्रौढत्व येत होते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी हाच अनुभव होता. असो. मी सिडनीविषयी बोलत होते. आता कोणत्याही दुर्बल माणसाला अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करावा लागणार नाही. त्यांना पूर्ण सन्मान आणि गौरव मिळेल. यू-ट्यूबवर हा व्हिडिआे उपलब्ध आहे. तुला तो पाहता येईल. त्या कार्यक्रमात दर्शकांचा कसा प्रतिसाद मिळत होता, हे त्यात दिसेल. त्यानंतर अतिशय जड मनाने मिलिबँडवर तुझे विनोद वाचले. (ते विनोद होते की नाही, मलाही ठाऊक नाही.)
माझा मुलगा ऑटिस्टिक आहे. तो खूपच सौम्य, शालीन, कष्टाळू आणि अतिशय गुणी आहे; परंतु अनेकदा तो लोकांकडे एकटक पाहत राहतो. रेल्वेतून प्रवास करताना लोकांना मला त्याचा आजार सांगावा लागतो. तो तुम्हाला एकटक बघत असल्यास, आय अॅम सॉरी. त्यावर लोकांची प्रतिक्रिया नम्र आणि सहानुभूतिदर्शक असते.
परंतु मला वाटते, त्याने तुला एकटक बघण्यास सुरुवात केली तर...? अर्थातच ही गोष्ट चांगली वाटणार नाही. तू त्याची टर उडवशील, टिंगल करशील. त्याच्या दुर्बलतेचा वापर त्याच्याविरोधात करशील. त्याला किती संकोच, लाजिरवाणे वाटत आहे किंवा तो किती दु:खी आहे, त्याला किती वेदना झाल्या असतील? याची तुला काही पर्वा नसेल. कारण या गोष्टी तुझ्या खिजगणतीतच नाहीत. ऑटिस्टिक मुलांचे जीवन खूप हालअपेष्टांचे असते, असे तुला वाटतच नाही. त्याला आणखी दयनीय का करतेस? बहुधा तुम्ही समाजात राहण्यास लायक नाहीत, हेच तुला त्यांना सांगायचे असेल ना? असे संकुचित विचार मांडण्यासाठी तुला किती पैसे मिळतात, हे मला ठाऊक नाही; परंतु निश्चित पुरेसे नसावेत. लवकरच मीडिया तुला प्रसिद्धीच्या झोतातून दूर करेल. तुझ्यावर टीका होईल. तिरस्काराच्या लाटांवर तुला गटांगळ्या खाताना सोडून दिले जाईल.
प्रामाणिकपणे सांगू- तुझे काय होईल, याचा माझ्यावर बिलकुल काहीही परिणाम होणार नाही; परंतु मला चिंता दुर्बल व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांची वाटते. तू त्यांच्या जीवनाला अधिकच आव्हानात्मक करत आहेस. कृपया या सर्व गोष्टी थांबव.
(कॅटीने मिलिबँड यांची टर उडवल्यामुळे लुसीने हे पत्र लिहिले.)