आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदीमध्ये महिलांचे प्रथमच मतदान, नगर परिषद निवडणुकीत उमेदवारीही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियाध - अत्यंत रूढीवादी म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियात नगर परिषदेच्या निवडणुकीत शनिवारी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. एवढेच नव्हे तर निवडणुकीत अनेक महिलांना उमेदवारीही मिळाली.

सौदीत महिलांना वाहन चालवण्यास बंदी आहे. वाहन चालवण्याची परवानगी नसलेला हा जगातील पहिलाच देश आहे. अशा परिस्थितीत यंदा पहिल्यांदाच महिलांना मतदान करण्याचा लोकशाहीतील हक्क प्रदान करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण ९०० महिला उमेदवार रिंगणात आहेत. पुरुष उमेदवारांची संख्या ६ हजारांवर आहे. महिलांना मतदानाचा अधिकार आणि मिळालेली उमेदवारी यामुळे ही निवडणूक ऐतिहासिक ठरली. मी जिंकण्यासाठी निवडणुकीच्या फडात उतरलेले नाही. कारण त्यात उतरणे हाच माझ्यासाठी विजय आहे. आपला समाज पुरुष वर्चस्वाखाली आहे. परंतु महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वत्र अग्रेसर आहेत. हे वास्तव नाकारता येणार नाही, अशी प्रतिक्रिया ६० वर्षीय उमेदवार अमाल बद्रेलडीन अल-सावरी यांनी दिली.
मला अभिमान वाटतो
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मला स्वत:चा अभिमान वाटू लागला आहे. मी हे करू शकते. म्हणूनच आजवर मी चांगल्या गोष्टी केल्या आहेत. त्या स्वत:च्या बळावरच केल्या आहेत, अशी भावना ५७ वर्षीय महिला उमेदवाराने व्यक्त केली.