आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos : पॅरीसमध्ये लावणीवर थिरकले महाराष्ट्रीयन, मराठी-अमराठी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - महाराष्ट्र मंडळ फ्रांसने ‘भारताची नृत्यमय यात्रा’ ह्या सांस्कृतिक कार्यक्रमातून १८ नोव्हेम्बरला पॅरीसमधील १० वी दिवाळी साजरी केली. मंडळाच्या आशा राजगुरू, शशी धर्माधिकारी आणि मुख्य अतिथी असलेले भारतीय दूतावासाच्या सांस्कृतिक विभागाचे अधिकारी श्रीजन शांडिल्य यांनी दीप प्रज्वलन केले. सुप्रसिद्ध मराठी लेखिका माधुरी शानभाग यांची कार्यक्रमास उपस्थिती हा दुग्धशर्करा योग होता. पॅरीसच्या १९व्या विभागातील क्युरियल हॉलमध्ये संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमास उपस्थित शंभराहून अधिक मराठी आणि अमराठी प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली.

 

भारतरत्न लता मंगेशकरांच्या शुभेच्छा

भारतरत्न लता मंगेशकर ह्यांनी फोनवरून महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला आणि सदस्यांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या सभासदांनी भारताच्या विविध प्रदेशातील लोकप्रिय आणि पारंपारिक नृत्ये सादर केली.कार्यक्रमाच्या सुरुवातीस माऊली माऊली गाण्यावरील सादर केलेल्या वारकरी नृत्याने वातावरण भारावून टाकले.

 

संपदा सावर्डेकर यांची लावणी

गरब्याने आणि भांगडा नृत्याने गुजराती आणि पंजाबी लोकजीवनाची झलक दाखवली. बालकलाकारांनी सुंदर कोळीनृत्य सादर केले. संपदा सावर्डेकर यांच्या दिमाखदार लावणीने प्रेक्षकांना पॅरिसमधून थेट पुण्यात पोहोचवले.

 

रेखा चंद्रमौळी यांनी तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषेतील लोकप्रिय चित्रपट गीतांवर विविध नृत्यशैली एकत्र करून मनोरंजक नृत्य सादर केले.   यातील ‘जीम्मिकी कमाल’ गीतावरील नृत्याला प्रेक्षकानी विशेष दाद दिली. प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे काही नृत्ये दुसर्यांदा सादर केली गेली. नथ, ठुशी आणि नऊवारी अशा अस्सल मराठमोळ्या वेशात अश्विनी दस्तेनवर यांनी आणि कुडता पायजमा या पारंपारिक भारतीय वेशामध्ये स्वानंद मारुलकर यांनी कार्यक्रमाचे मराठी व इंग्रजीमध्ये उठावदार सूत्रसंचालन केले.

 

 

माधुरी शानभाग यांच्या हस्ते बक्षीस देवून बालकलाकारांच्या नृत्यातील सहभागाचे आणि उत्तम प्रदर्शनाचे कौतुक केले गेले. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद आणि भारतीय दूतावासाचे श्रीजन शांडिल्य यांनी केलेले कार्यक्रमाचे मनापासून कौतुक हीच कार्यक्रम उत्तम झाल्याची पावती होती. संपदा सावर्डेकर, रेखा चंद्रमौळी आणि मंदार आठल्ये यांनी कार्यक्रमातील नृत्यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन केले आणि सर्व सभासदांनी अत्यंत मेहेनतीने हि नृत्ये सादर केली.

 

महाराष्ट्र मंडळ फ्रांसच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकांना आपल्यातल्या कलागुणांना अभिव्यक्त करता येते तसेच अनेकांना आपल्यातल्या सूप्त गुणांचा शोध लागतो हे या कार्यक्रमांचं आणि मेहेनतीचं फलित आहे. 
 

पुढील स्लाईडवर पाहा - ‘भारताची नृत्यमय यात्रा’चे फोटोज

बातम्या आणखी आहेत...