वॉशिंग्टन- फेसबुकचा सीईआे मार्क झुकेरबर्गच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची चाहूल लागली असून बाळाच्या स्वागतासाठी त्यांचा दोन महिने पितृत्व रजेवर जाण्याचा विचार आहे. अब्जाधीशाच्या आयुष्यात कुटुंबाचे स्थान किती मोठे आहे, हेच यावरून स्पष्ट होते.
३१ वर्षीय झुकेरबर्ग यांना मुलगी व्हावी अशी इच्छा आहे. पत्नी प्रिसिला चान (३०) यांना अलीकडेच अनेक वेळा गर्भपाताला सामोरे जावे लागले होते. त्यातून सावरत पत्नीची भरपूर काळजी घेऊन प्रसूती सुखरूप होण्याची आणि पहिल्या बाळाचे स्वागत करण्याची त्यांना उत्सुकता लागली आहे. प्रत्येक दिवस आम्ही आमच्या बाळाच्या जवळ पोहोचत आहोत. आता हा टप्पा आणखी पुढे जाऊन प्रत्यक्षात उतरावा असे आम्हाला वाटते, असे झुकेरबर्गने म्हटले आहे. फेसबुकवरून झुकेरबर्गने
आपल्या भावना मांडणारी पोस्ट केली आहे.
सुट्यांची चर्चा
याहूचेसीईआे मारिसा मेयर यांनी आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मावेळी सहा आठवड्यांची रजा घेतली होती. त्यांच्यापेक्षा आणखी काही दिवस जास्त रजा झुकेरबर्ग घेणार असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक फेसबुक आपल्या कर्मचाऱ्यांना प्रसूतीसाठी दोन महिन्यांपेक्षा कमी एवढी पितृत्व रजा देते. गुगलकडून ती १२ आठवड्यांची तर मातृत्व रजा १८ आठवड्यांची असते. मायक्रोसॉफ्ट नवीन जोडप्याला १२ आठवड्यांची सुटी बहाल करते.