आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसूदला अतिरेकी ठरवण्यात सुरक्षा परिषदेचे राजकारण, भारताचे स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - दहशतवादप्रश्नी भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आणला आहे. भारतात दररोज दहशतवादी हल्ले होत आहेत. परंतु सुरक्षा परिषद दहशतवादी मसूद अझहरला निर्बंधांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत राजकारण करू पाहत आहे, अशा कडक शब्दांत भारताचे स्थायी राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी परिषदेवर टीका केली.
अकबरुद्दीन मंगळवारी म्हणाले, सुरक्षा परिषद ‘काळ आणि आपल्याच राजकारणात’ अडकून पडली आहे. भारताने मसूद अझहरला निर्बंधांच्या यादीत समाविष्ट करण्यासंबंधीचा प्रस्ताव ठेवला होता. तो पाकिस्ताच्या म्हणण्यावरून चीनने ‘तांत्रिक आधारे’ व्हेटोद्वारे स्थगित ठरवला होता. सहा महिन्यांचा नियोजित कालावधी पूर्ण झाल्यानंतर चीनने पुन्हा एकदा व्हेटो लागू केला होता.

सुरक्षा परिषदेतील समता या विषयावरील एका परिसंवादात अकबरुद्दीन मंगळवारी बोलत होते. ते पुढे म्हणाले, सुरक्षा परिषदेत सुधारणेला फारसा वाव दिसत नाही. फेररचनेची कूर्मगती आहे. हा पेच वेळीच सोडवणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही आपण सिरिया व सुदानमध्ये सुरक्षा परिषदेची कारवाईदेखील पाहिली आहे. सहमतीनंतरही त्यास लागू केले जाऊ शकत नाही.
भारताला सत्तेची हाव : पाकिस्तान
पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधी मलिहा लोढी म्हणाल्या, भारताला सत्ता व सुविधांची हाव आहे. त्यासाठीच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही सुरक्षा परिषदेचा विस्तार व फेररचनेला विरोध करतो. परंतु पाकिस्तानला तात्पुरत्या स्वरूपातील जागांची संख्या वाढवून हवी आहे. ते मान्य व्हायला हवे. त्यातूनच लोकशाही, उत्तरदायित्व, पारदर्शक कारभार होऊ शकतो, असे लोढी यांनी म्हटले आहे.

उपउच्चायुक्तंाना पाचव्यांदा पाचारण
इस्लामाबाद | सीमेवरील चकमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजकीय पातळीवरील आगळीकही थांबलेली नाही. मंगळवारी भारताच्या उपउच्चायुक्तांना पाक सरकारने पाचारण केले होते. उपउच्चायुक्तांना दोन आठवड्यांत बोलावण्याची ही पाचवी वेळ होती. पाकिस्तानचे दक्षिण आशिया व सार्क विभागाचे संचालक मोहंमद फैजल यांनी उपउच्चायुक्त जे.पी. सिंग यांना बोलावले होते. २००३ च्या शस्त्रसंधी कराराचा आदर करावा, असे फैजल यांनी सांगितले. या घटना २५, २६, २८ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरच्या आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

तीन मुत्सद्दी मायदेशी रवाना
सिडनी | हरेगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले भारताचे तीन मुत्सद्दी मायदेशी परतणार आहेत. पाकिस्तानने उच्चायुक्त कार्यालयातील आठ अधिकाऱ्यांपैकी तीन जणांवर हा आरोप केला आहे. अनुराग सिंग, विजय कुमार वर्मा, माधवन नंदकुमार यांना दुबईस पाठवून देण्यात आले आहे. राजेश कुमार अग्निहोत्री, अमरदीप सिंह बट्टी, धर्मेंद्र सोधी, बलबिर सिंह, जयबालन सेंथील यांनाही वाघा बॉर्डर मार्गे भारतात परतावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...