आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting Of The European Union Foreign Affairs Council In Brussels

इराणवरील निर्बंध उठवले, युरोपियन संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीतील निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - व्हिएन्ना-जागतिक निरीक्षकांच्या आढाव्यानंतर इराणवरील तेल आणि आर्थिक निर्बंध उठवण्यात आले आहेत. अमेरिका आणि युरोपियन संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी म्हणाले, देशासाठी हा नवीन अध्याय आहे.

अणू कार्यक्रमात घट करण्यासाठी गेल्या वर्षभरात इराणने योग्य पद्धतीने प्रयत्न केले आहेत, असा निर्वाळा अमेरिका आणि युरोपियन संघटनेच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. वास्तविक संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र संघटनेकडून गेल्या अनेक वर्षांपासून इराणवर निर्बंध घालण्यात आले होते. अणू कार्यक्रमात घट करण्यासाठी इराणने दाखवलेल्या बांधिलकीमुळे आता गेल्या वर्षी मांडण्यात आलेल्या समझोत्याची अंमलबजावणी होणार आहे. कागदावर देण्यात आलेल्या आश्वासनांची प्रत्यक्षात पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही इराणने दिली आहे, असे बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी सांगितले.
२०१२ पासून फटका
अमेरिका आणि युरोपियन संघटनेच्या तेल आणि आर्थिक निर्बंधांमुळे इराणला २०१२ पासून सुमारे १६० अब्ज डॉलर्सचा महसूल बुडाला आहे.
अणुबॉम्बबद्दल स्पष्टता नाही
इराणने आपला अणू कार्यक्रम शांततामय उद्देशासाठी असल्याचे वारंवार सांगितले. निर्बंध उठल्यामुळे त्यांच्या उद्देशावर शिक्कामोर्तब झाले आहे. परंतु करारामध्ये इराणकडून भविष्यात अणुबॉम्ब तयार केला जाणार नसल्याची स्पष्टता दिसून नाही. त्यावरच अमेरिकेचा विरोध होता.
इराणकडून पत्रकाराची सुटका
इराणने ४ अमेरिकनांची सुटका केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील आंतरराष्ट्रीय संबंधाला शनिवारपासून नव्याने सुरुवात झाली आहे. त्यामुळे इराणने आपल्या तुरुंगात असलेल्या ४ अमेरिकींची सुटका केली. त्यावर अमेरिकेने समाधान व्यक्त केले आहे.
नेमका फायदा काय?
निर्बंध हटवण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इराणला आता पुन्हा तेल विक्री करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर व्यापार करण्यासाठीदेखील जागतिक आर्थिक व्यवस्थेचा उपयोग होईल. त्याशिवाय सुमारे १०० अब्ज डॉलरची संपत्तीदेखील पुन्हा देशाला मिळेल.
आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
- सर्व बाजूंनी चांगले प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर सर्वांनी दिलेल्या बांधिलकीचे तंतोतंत पालन केले. त्याचे हे फलित आहे.
बान की मून, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्र
- अनेक वर्षांचा संयम, सातत्यपूर्ण मुत्सद्देगिरी आणि कठीण प्रकारचे तांत्रिक काम या सर्वांचा परिपाक म्हणून समझोत्याला मंजुरी मिळाली याकडे पाहिले पाहिजे.
फिलिप हॅमंड, परराष्ट्रमंत्री, ब्रिटन.
- अतिशय कठीण गोष्ट प्राप्त करण्यात आली. ‘अंमलबजावणी दिन’ म्हणूयात. समझोत्याचा निर्णय हे अतिशय चांगले पाऊल आहे.
वँग यी, चीनचे परराष्ट्रमंत्री

- इराणची अण्वस्त्रे तयार करण्याची इच्छा कायम राहणार आहे हे स्पष्ट झाले. हा समझोता आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आंधळेपणाने झाला आहे. त्यामुळे त्याला अर्थ नाही.
डॅनी डेनॉन, संयुक्त राष्ट्रातील राजदूत, इस्रायल