सिरियाचा तीन वर्षांचा मुलगा आयलान कुर्दीचे कलेवर समुद्रकिनार्यावरून उचलणारा सार्जंट मेहमेत सिपलाक अद्यापही या धक्क्यातून सावरला नाही. ते १८ वर्षांपासून निमलष्करी दलात सार्जंट पदावर कार्यरत आहेत. एवढ्या दीर्घ सेवेत त्यांनी निरनिराळे गुन्हे पाहिले. मात्र, कोवळ्या मुलाचे पार्थिव उचलल्यानंतर हृदयावर आघात झाल्याची त्यांची मनोभावना आहे. त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो जिवंत असावा, अशी ईश्वराकडे प्रार्थना केली. मात्र, दुर्दैवाने तो गतप्राण झाला होता. या घटनेच्या मला खूप वेदना झाल्या. पार्थिव उचलताना आपले चित्र कॅमेर्यात कैद होतेय याची जाणीव नव्हती. जगात छायाचित्राची चर्चा झाली.त्याला पाहताच माझ्यातला पिता जागा झाला. माझाही मुलगा सहा वर्षांचा आहे. मुलाला उचलताच मनाला धक्का बसला.
यातून अद्याप सावरू शकलो नाही. कारण त्याला उचलण्याआधी मी त्यात माझा मुलगा पाहत होतो. त्या मुलाचे दु:ख तुम्ही कसे सोसता? अशी विचारणा लोक माझ्याकडे करतात. मेहमेत सिपलाक तुर्कस्तानच्या गेंडरमिरी जनरल कमांडमध्ये आहेत. ग्रामीण आणि किनारपट्टी क्षेत्रात कार्यरत असणारी तुर्कस्तानच्या सशस्त्र दलाची ही एक शाखा आहे. गेंडमिरी कमांड १७५ वर्षे जुनी आहे. यामध्ये जवळपास १ लाख ९० हजार लोक आहेत. मेहमेत म्हणाले, तुर्कस्तानच्या ८० टक्के सीमेची जबाबदारी आमच्या तुकडीकडे आहे. गेंडरमिरी तपास नाक्याकडे पोहोचताच तुर्कस्तानचे संस्थापक कमाल अतातुर्क यांचे वाक्य दृष्टीस पडते - तुर्की गेंडरमिरी कायद्याचे लष्कर आहे.
अशा पद्धतीने नौका बुडण्याची दुर्घटना रोखण्याचे आम्ही खूप प्रयत्न करतो. यासोबत आम्ही बेकायदेशीर पद्धतीने समुद्र पार करण्याची परवानगी देत नाहीत. २०१२ पासून ते बोडरमच्या किनार्यावर काम करत आहेत. त्यांच्यासोबतचे बरेच जवान मृतदेहाला हात लावण्यास धजावत नाहीत. मुलाला उचललेले छायाचित्र जगभरात पोहोचल्यानंतर मी खूप चांगले काम करत आहे, अशी भावना माझे मित्र, पत्नी आणि नातेवाइकांत झाली. त्यांच्या डोळ्यात जे भाव व्यक्त झाले होते, ते अवर्णनीय होते.