आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशेल-ओबामांची प्रेमकहाणी पडद्यावर, \'साऊथसाइड विथ यू\' चित्रपटाची जय्यत तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२७ वर्षीय बराक ओबामा यांनी २५ वर्षांच्या मिशेल रॉबिन्सन यांचे हृदय कसे जिंकले असेल? हे जाणून घेण्याची उत्कंठा सर्वांनाच आहे. या पार्श्वभूमीवर मिशेल आणि बराक ओबामा यांच्या प्रेमकहाणीवर आधारित 'साऊथसाइड विथ यू' हा चित्रपट लवकरच पडद्यावर येणार आहे.
या चित्रपटात १९८९ च्या उन्हाळ्यातील दोघांची पहिली डेट दाखवली जाणार आहे. कारण, या पहिल्या भेटीतच ओबामा यांनी मिशेल यांचे मन जिंकले होते. शिकागोमधील या भेटीत दोघांनी आधी आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये 'डू द राइट थिंग' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर सोबत जेवण केले व मनोहारी अशी सायंकाळ सोबत घालवली. तीन वर्षांनंतर १९९२ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. या भेटीवर आधारित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित नाही. मात्र, चित्रीकरणापूर्वीच त्यासंबंधी काही छायाचित्रे जारी झाली आहेत. यंदा वर्षअखेरपर्यंत चित्रीकरण व प्रॉडक्शनचे काम सुरू राहील. २०१६ च्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

होमग्रोन पिक्चर्स निर्मित या चित्रपटात अभिनेत्री टीका सम्पटर युवा मिशेल यांची, तर पार्कर सायर्स हे बराक ओबामा यांची भूमिका साकारत आहे. रिचर्ड टॅन दिग्दर्शक असून याची पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. २००७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा चित्रपट बनवण्याचा विचार केला. ट्रेसी बिंग आणि स्टेफनी अॅलेन चित्रपटाचे निर्माते आहेत. एका मुलाखतीदरम्यान बराक ओबामा यांनी त्यांच्या डेटविषयीची संपूर्ण कहाणी सांगितली होती.

१९८८ मध्ये विधीच्या प्रथम वर्षाच्या शिक्षणानंतर शिकागोमधील सिडले अँड ऑस्टिन लॉ फर्ममध्ये नोकरीवर असताना मिशेल आणि ओबामा यांची भेट झाली होती. ओबामा यांच्या मते, मिशेल यांची तेव्हा त्यांच्या सल्लागारपदी नियुक्ती होणे हा आपल्या आयुष्यातील सर्वांत सुखदायक योगायोग होता. मिशेल यांचे सौंदर्य व उंचीवर ते भाळले होते. ओबामांनी एका फर्मच्या रेकॉर्डसाठी पाठवलेल्या छायाचित्रात त्यांचे नाक आणि कान मोठे वाटत नव्हते. प्रत्यक्षात मात्र त्यांचे रूप मोठे नाक-कान असे होते. हे पाहून मिशेल थोड्या आश्चर्यचकितही झाल्या होत्या. नंतर कामाच्या निमित्ताने त्यांची नेहमीच भेट व्हायची.

मिशेल मोठ्या मनाची : ओबामा यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, मिशेल इतकी चांगली होती की, तिने मला अनेक पार्ट्यांत नेले. मात्र, माझ्या गावंढळ कपड्यांवर नाराजी किंवा टीका केली नाही. त्यानंतर मी तिला डेटविषयी विचारले तर तिने नकार दिला. त्यानंतर अनेकदा विचारूनही तिचा नकारच होता. मी तुमची सल्लागार आहे आणि असे वागणे योग्य नाही, असे ती म्हणायची. शेवटी, मी नोकरी सोडण्याची धमकी देताच तिने होकार दिला. त्या पहिल्या डेटच्या आठवणी बराक आणि मिशेल यांच्या हृदयात आजही कायम आहेत. एका कार्यक्रमात मिशेल म्हणाल्या होत्या, एका कला संस्थेत भोजनानंतर आम्ही सुंदर कारंजी असलेल्या एका चौकात शतपावली केली. नंतर चित्रपटही पाहिला.

'ओबामा : फ्रॉम प्राॅमिस टू पॉवर'चे लेखक डेव्हिड मेनडेल यांना मिशेल यांनी सांगितले होते की, सुरुवातीला ओबामांना पाहून फार काही वाटले नव्हते. डेटच्या दिवशी तर ओबामांनी गचाळ स्पोर्ट््स जॅकेट घातले होते.