आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांच्या चर्चेनंतर दहशतवाद्यांनी 82 विद्यार्थिनींना सोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आबुजा- बोकोहरम या दहशतवादी संघटनेसोबत नायजेरियाच्या सरकारकडून सुरू असलेल्या चर्चेला अखेर यश आले आहे. तब्बल सहा महिन्यांच्या चर्चेनंतर बोकोहरमने ८२ शालेय विद्यार्थिनींची सुटका केली आहे. १४ एप्रिल २०१४ मध्ये चिबोकच्या एका शाळेतून २७६ विद्यार्थिनींचे अपहरण करण्यात आले होते. या ८२ मुली त्यापैकीच आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटून आलेल्या विद्यार्थिनींनी शनिवारी आबुजामध्ये राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची भयानक कहाणी विशद केली. बोकोहरमने अपहरण केलेल्या या विद्यार्थिनींमधील बहुतांश ख्रिश्चनधर्मीय होत्या. 

मुलींच्या सुटकेसाठी नायजेरिया सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. दहशतवाद्यांशी सतत चर्चाही सुरू होती. याच पार्श्वभूमीवर मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात २१ मुलींची सुटका करून आणण्यात सरकारला यश आले होते. मात्र, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटून आलेल्या या २१ मुलींपैकी बहुतांश गर्भवती होत्या. शिवाय दहशतवाद्यांनी त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले होते. संघटनेच्या दहशतवाद्यांशीच त्यांचे लग्नही लावून देण्यात आले होते. नायजेरियन लष्करातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अपहृत ८२ विद्यार्थिनींना दहशतवाद्यांनी कॅमरूनच्या सीमारेषेवर सोडले. तेथून त्यांना बोर्नाे प्रांताची राजधानी मैदुगुरीमध्ये आणण्यात आले. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. दरम्यान, या चाचणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.  

दहशतवाद्यांशी यशस्वी चर्चा  
नायजेरियाचे राष्ट्रपती बुहारी यांनी दहशतवादाचा नायनाट करण्याची शपथ घेतली होती. मात्र, दहशतवाद्यांकडून त्यांना त्यानंतर मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. हल्ले, बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर बोकोहरमच्या दहशतवाद्यांनी निष्पाप मुलींना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे बुहारी यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले, पण अपहृतांच्या सुटकेसाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले. या प्रकरणी त्यांना रेडक्रॉस, स्विस सरकार तसेच अन्य काही देशांचेही सहकार्य मिळत आहे.  
 
मुलींच्या बदल्यात दहशतवादी सोडणार  
दरम्यान, या ८२ मुलींच्या सुटकेच्या बदल्यात नायजेरियन सरकारने बोकोहरमच्या काही दहशतवाद्यांची सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नायजेरिया सरकार आणि बोकोहरम यांच्यातील या चर्चेत रेडक्रॉससारख्या काही जगप्रसिद्ध संस्थांनी मध्यस्तांची भूमिका बजावली. मागच्या वेळी २१ मुलींची सुटका करण्याच्या प्रकरणात नायजेरियन सिनेटर शेहू सानी यांनी प्रमुख भूमिका बजावली होती.

आंतरराष्ट्रीय  स्तरावरील व्यक्तींकडून तीव्र निषेध  
बोको हरमने नोव्हेंबर २०१४ मध्ये ३०० बालक व ५०० पेक्षा जास्त नागरिकांचे दमास्कसमधून अपहरण केले. त्यानंतरही अशा घटना सुरू आहेत. त्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा आणि अनेक हॉलीवूड अभिनेत्यांनी या घटनेचा निषेध करण्यात आला होता. सामाजिक संकेतस्थळांवर त्यांनी अभियानही सुरू केले होते.

बोकोहरमला हवे ‘खलिफा राज’  
बोकोहरम या संघटनेला नायजेरियामध्ये खलिफा राज प्रस्थापित करायचे आहे. २००९ पासून या भागात प्रचंड सक्रिय असलेल्या या संघटनेने आतापर्यंत सुमारे २० हजार लोकांची हत्या केली आहे. दरम्यान, शुक्रवारी अमेरिकेने बोकोहरमचा म्होरक्या अबू बकर शेखूला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. बोकोहरमने विदेशी लोकांच्या अपहरणाचा प्रयत्न करण्याची हिंमत करू नये, असे अमेरिकेने ठणकावून म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...