आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसजीसाठी भारताला मेक्सिकोचा पाठिंबा, कृषी-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत सहकार्यावर सहमती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेक्सिको सिटी - स्वित्झर्लंडनंतर मेक्सिकोने भारताला एनएसजी अर्थात अणुपुरवठादार संघटनेच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. सेऊलमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोचे समर्थन महत्त्वाचे आहे. दरम्यान, भारत व मेक्सिको यांच्यात कृषी तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, सौरऊर्जा, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्य करण्यावर उभय देशांत सहमती झाली आहे.
एनएसजीसाठी भारताचा दावा योग्य अाहे. सदस्यत्वासाठी भारताची योग्यताही आहे. त्यामुळेच भारताच्या विनंतीला विधायकरीत्या आमचा पाठिंबा आहे, असे मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एनरिक पेना निटो यांनी जाहीर केले. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली.
मोदी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. ऊर्जेच्या क्षेत्रात भारत-मेक्सिको महत्त्वाचे भागीदार आहेत. सामरिक भागीदारीतही सहकार्य करण्यावर उभय देशांत सहमती अाहे.
त्यासाठी आराखडा तयार करण्यात येणार आहे, असे माेदी म्हणाले. सोमवारी मोदींनी स्वित्झर्लंडला भेट दिली होती. त्या वेळी स्विसने एनएसजीसाठी पाठिंबा दिला होता.
एनएसजीचे सदस्यत्व मिळाल्यास देशाच्या आण्विक ऊर्जा क्षेत्राचा विकास व्हायला मदत मिळेल. ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये एनएसजी बैठकीत चीनने भारताच्या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. ४८ सदस्यीय एनएसजीत नवीन सदस्याची निवड सर्व सहमतीने केली जाते. २४ जून रोजी सेऊलमध्ये बैठक होणार आहे. त्यात भारताच्या विनंती अर्जावर विचार होईल. म्हणूनच आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अमेरिकेने मात्र भारताच्या दाव्याला जोरदारपणे पाठिंबा दिला. भारताने १२ मे रोजी अर्ज केला होता.
राष्ट्राध्यक्षांनी केले मोदींचे सारथ्य
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष पेना निटो यांनी गुरुवारी शिष्टाचार बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वत: वाहन चालवले. त्यांनी मोदींना गाडीने मेक्सिकोच्या व्हेज रेस्तराँमध्ये नेले. किंटॉनील नावाच्या रेस्तराँमध्ये मोदींनी शाकाहारी भोजनाचा स्वाद घेतला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी दिली. त्याअगोदर निटो यांनी मोदींच्या स्वागताचे छायाचित्र ट्विट केले. त्यावर मोदींनी आभाराची प्रतिक्रिया दिली.
महान लेखकाचा उल्लेख
मोदी यांनी आपल्या भाषणात महान लेखक ऑक्टेव्हिआे पाझ यांच्या ‘इन लाइट ऑफ इंडिया’ पुस्तकाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मी मेक्सिकन असल्यामुळे मला भारतीयत्व काय असते हे उमगले, असे पाझ यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. अर्थात, आपण नव्या वाटांनीदेखील विकास साधू शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
मोदी आज मायदेशी
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांचा दौरा आटोपून शुक्रवारी मायदेशी पोहोचतील. पाच दिवसांत त्यांनी पाच देशांचा दौरा केला. ४ जून रोजी त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती. त्यात अफगाणिस्तान, कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका व मेक्सिकोचा समावेश होता. हा दौरा अतिशय लाभदायी ठरल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॅक्सिकोमधील जंगी स्वागताचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...