आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than 1500 Died In Nepal EarthQuake, Everest Also Shaken

नेपाळ उद्ध्वस्त! ८१ वर्षांतील भीषण भूकंप, १५०० ठार, भारतात १९ राज्यांना धक्के,५७ बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू/नवी दिल्ली/पाटणा - नेपाळमध्ये ८१ वर्षांनंतर सर्वात भीषण भूकंप झाला. शनिवारी सकाळी सुमारे पावणेबारा वाजता धरणी हादरली आणि काही मिनिटांतच शतकानुशतकांचा वारसा उद‌्ध्वस्त झाला. तासाभरानंतर मृत्यूचे आकडे येऊ लागले आणि घड्याळाच्या काट्याबरोबरच ते झपाट्याने वाढले. आधी ५०, नंतर १००, २००, ५०० आणि सायंकाळपर्यंत हजार-पंधराशे. हा आकडा किती वाढेल हे माहीत नाही. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. हजारोंपर्यंत मदत पोहोचायची आहे. या भूकंपाचा फटका भारतालाही बसला. देशात ५७ जण ठार झाले. नेपाळनजीकच्या बिहारमध्ये सर्वाधिक ४५ ठार झाले. उर्वरित पश्चिम बंगाल व यूपीतील आहेत.
बिहार : सर्वाधिक नुकसान झालेले राज्य, ३८ जणांचा मृत्यू, अनेक ढिगाऱ्याखाली
बिहारमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक ३८ जणांचा मृत्यू झाला. पूर्व चंपारण्यमध्ये ७, दरभंगा-५, सीतामढी-५, सारण-४ जणांचे मृत्यू झाले. अररिया-३, मधुबनी-शिवहर प्रत्येकी दोन जणांचे प्राण गेले. राज्यात आगामी ४८ तासांत भूकंपाचे आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश : नेपाळजवळील गोरखपूरमध्ये, सर्वाधिक परिणाम, ९ जणांचा मृत्यू
भूकंपामुळे उत्तर प्रदेशात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक नुकसान नेपाळच्या शेजारी असलेल्या गोरखपूर जिल्ह्यात झाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ७ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

देशभरात बसले धक्के
बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र, केरळ, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, पश्चिम बंगाल, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही भूकंपाचे धक्के. १९९१ नंतर आजपर्यंतचा पहिल्यांदाच एवढा प्रभावित परिसर. म्हणजे देशात १९ लाख चौरस किमी परिसरात भूकंप ८० कोटी लोक हादरले
असा होता भूकंप
- रिश्टर स्केलवर ७.९ ची तीव्रता
- काठमांडपासून ८० किमीवर लामजुंगमध्ये जमिनीखाली १५ किमीवर होता केंद्रबिंदू
- दिवसभरात बसले १७ हून अधिक धक्के
- १० ते १५ दिवस आणखी भूकंपाचे धक्के बसणार
मदतकार्यात भारत
- पंतप्रधानांची आपत्कालीन बैठक, वेगळा नियंत्रण कक्ष
- एनडीआरएफच्या १० टीम नेपाळला रवाना, रविवारी आणखी मदत पाठवण्यात येणार
- दोन ग्लोबमास्टरसह चार विमाने रवाना, मदतकार्यासाठी १० हेलिकाॅप्टरही पाठवले.

भूकंप लाइव्ह

मी मंदिराला खंडहर होताना पाहिले
काठमांडूच्या टीव्ही वाहिनीत व्हिडिआे एडिटर असलेल्या शिवा दलाल यांनी एका संकेतस्थळावर घटनेचा जिवंत वृत्तांत मांडला. तो असा : मी काठमांडूत कार्यालयाजवळ सुरक्षित आहे. प्रत्येकाच्या मनात भीती आहे. मला येथे हेलिकॉप्टर आणि अॅम्ब्युलन्सचे आवाज ऐकायला मिळत आहेत. मी डोळ्यात एका मंदिराला खंडहर झाल्याचे पाहिले. काही वेळापूर्वी मी त्रिपुरेश्वर येथील माझ्या कार्यालयात होतो. त्या वेळी भूकंपाचा पुन्हा धक्का जाणवला. असा अनुभव मी कधीही घेतला नव्हता.
जमीन गिळंकृत करेल वाटले ..
४४ वर्षीय ब्रिटिश सीन जेम्स दुबईत राहतात. घटनेच्या वेळी ते एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या उत्तरेकडील भागात होते. टेलिग्राफला दिलेली माहिती अशी :
मी एक व्यावसायिक गिर्यारोहक आहे. मी याअगोदरही अनेक वेळा हिमस्खलनाचा अनुभव घेतला आहे. परंतु कधीच एवढा घाबरलो नव्हतो. भूकंपाचा धक्का बसल्यानंतर एखाद्या बोटीवर असल्यासारखे वाटले होते. धरणीकंप जाणवत होता. वाटत होते. खोल जाऊन पडेल. जमीन दुभंगेल. हा भयंकर अनुभव होता.
भूकंपात रामदेव बाबा बचावले
काठमांडू | योग शिबिरासाठी गेलेले रामदेव बाबा भूकंपात बालंबाल बचावले. त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात : मी निघाल्याच्या पाच मिनिटांनंतरच आपला पेंडॉल खाली कोसळला. कारमध्ये बसणार होतो, एवढ्यात कार जोरजोराने हलत होती. मी पहिल्यांदा इमारत कोसळताना पाहिली, असा थरारक अनुभव येण्याची ही पहिलीच वेळ होती.
ऐतिहासिक स्वयंभूनाथ स्तूप सुरक्षित
भूकंपाच्या धक्क्यानंतरही काठमांडूतील ऐतिहासिक स्वयंभूनाथ स्तूप सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. परिसरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. छोटी दुकाने, मंदिरे १५ सेकंदांत जमीनदोस्त झाली. भूकंपाचे धक्के बसल्यानंतर एकच गोंधळ उडाला. पर्यटकांनी धावपळ करण्यास सुरुवात केली. काही ढिगाऱ्याखाली दबले. काहींना बाहेर काढण्यात आले तेव्हा ते रक्तबंबाळ झाले होते. काहींचे पाय तुटले तर काहींचे डोके फुटलेले.

रुग्णालयात गर्दीच गर्दी, रस्त्यावरच उपचार
नेपाळमधील नैसर्गिक संकटाचे चित्र अतिशय विदारक अाहे. जखमींना रस्त्यावरच उपचार घ्यावे लागत आहेत. रुग्णालयांत गर्दीच गर्दी दिसली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, एव्हरेस्टही हादरला, कसा झाला भूकंप आणि गेल्या तीस वर्षांतील प्रलयकाली भूकंप...