आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांनंतर आई-मुलाची भेट; वडील गेले होते घेऊन, आईने शोध सुरुच ठेवला,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेन बर्नार्डिनो (कॅलिफोर्निया)- २१ वर्षांपूर्वी आपला पहिला मुलगा गमावलेल्या ४२ वर्षीय मारिया मेन्सियाने मुलाची पुन्हा भेट होईल, अशी अपेक्षाच केली नव्हती. पण सेन बर्नार्डिनो काउंटीच्या डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या मुले अपहरण शाखेला कुठूनतरी माहिती मिळाली. त्यानंतर मेमध्ये मारिया आणि स्टीव्ह हर्नाडेंझचे डीएनए नमुने जुळवण्यासाठी पाठवले गेले. नमुने जुळले आणि आई-मुलाची पुन्हा भेट झाली.

१९९५ मध्ये स्टीव्ह १८ महिन्यांचा होता तेव्हा मारियाशी वाद झाल्याने त्याचे वडील व्हॅलेंटिन हे त्याला घेऊन मेक्सिकोला गेले होते. मारिया सांगते की त्या वेळी काय झाले हे मला माहीत नाही. मी मुले अपहरण शाखेकडे तक्रार केली. अनेकदा पाठपुरावा करूनही निराशाच हाती आली.
मारियाजवळ स्टीव्हचा पिवळा पडलेला एकमेव फोटो होता. मुलाचा पत्ता लागावा म्हणून काउंटीने तो जारी केला. तपासकर्ते केरेन क्रेग म्हणाले की, मुलापर्यंत पोहोचण्याचे हे एकमेव माध्यम होते. फेब्रुवारीत क्रेग आणि त्यांचा सहकारी मिशेल फॅक्सनला स्टीव्हबाबत माहिती मिळाली. दोघांनीही प्रयत्न सुरू केले. स्टीव्ह आता २२ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे २१ वर्षांपूर्वी अपहरण झालेला हाच तो स्टीव्ह हे सिद्ध करणे हे मोठे आव्हान होते.

स्टीव्हला आश्वस्त करणे आवश्यक होते. वडिलांचा शोध घ्यायचा असल्याने डीएनए नमुने पाहिजेत, असे क्रेगने त्याला सांगितले. क्रेग म्हणाले की, यातून काय साध्य होईल हे निश्चित नसल्याने आम्ही त्याला सत्य सांगितले नाही. मे महिन्यात न्याय विभागाच्या प्रयोगशाळेत आई-मुलाचे डीएनए नमुने पाठवले. काही आठवड्यांतच डीएनए जुळल्याची आनंदवार्ता कळली. क्रेग आणि फॅक्सन मारियाच्या घरी पोहोचले आणि ही माहिती दिली. आधी तर तिचा विश्वासच बसला नाही, पण नंतर तिला रडू फुटले.

मारिया आणि स्टीव्ह गुरुवारी डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात भेटले तेव्हा दोघेही भावुक झाले. स्टीव्ह म्हणाला की, हा तर माझ्यासाठी धक्काच होता. आई जिवंत आहे आणि आमची भेट होईल, असे वाटलेच नव्हते. कारण आई लहानपणीच वारली असे मला वडिलांनी सांगितले होते. पण तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद, त्यांच्यामुळेच हे शक्य झाले.
बातम्या आणखी आहेत...