आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाची शाळेला दांडी, आईला झाली अटक, अमेरिकेच्या जॉर्जियातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटा (अमेरिका) - आपल्या देशात म्हणजे भारतात तब्येत ठीक नाही किंवा आज इच्छा नाही, असे कारण सांगून मुले अनेकदा शाळेला दांडी मारतात. पण त्यासाठी मुलांच्या आई-वडिलांना अटक केली जात नाही. पण अमेरिकेच्या जॉर्जियात तसे होते. मुलगा शाळेत परवानगीशिवाय गैरहजर राहिल्याने त्याच्या आईला अटक झाली.

जॉर्जियातील सिल्वेनिया शहरातील ही घटना आहे. तेथील ज्युली जाइल्स यांना १० वर्षांचा मुलगा आहे. नाव आहे सॅम्युअल. तो चौथीत शिकतो. गेल्या १० मे रोजी स्थानिक पोलिस प्रशासनातर्फे ज्युली यांना एक नोटीस मिळाली. ‘तुम्ही तुमचा मुलगा सॅम्युअलला यावर्षी १२ दिवस शाळेत पाठवले नाही. तेही परवानगी न घेता. त्यामुळे स्क्रीवन काउंटीच्या नियमांनुसार तुम्हाला अटक होईल,’ असे नोटिशीत नमूद होते. नोटिशीमुळे हैराण झालेल्या ज्युली जवळच्या पोलिस ठाण्यात पोहोचल्या. नियमांनुसार तुमचा मुलगा वर्षभरात केवळ सहा वेळा शाळेत गैरहजर राहू शकतो. त्यामुळे जास्त सुटी घेतल्याने पालकांना शिक्षा होईल, असे त्यांना सांगण्यात आले.

ज्युली यांनी पोलिसांना सांगितले की, मेच्या पहिल्या आठवड्यात सॅम्युअलची तब्येत खराब झाली होती. तीन दिवसांचे वैद्यकीय प्रमाणपत्र शाळेत पाठवले होते. पण तीन दिवसांनंतरही तो बरा झाला नाही. इतर मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्याला शाळेत पाठवले नाही. त्याचबरोबर प्रचंड खर्च येत असल्याने पुन्हा वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले नाही. पण पोलिसांनी ज्युली यांचे काहीही ऐकले नाही आणि अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. एक दिवसाच्या जामिनावर ज्युलींची मुक्तता झाली. त्यांनी १४ मे रोजी फेसबुकवर घडलेली घटना सांगितली. योगायोगाने दुसऱ्या दिवशी म्हणजे १५ मे रोजी चांगली वर्तणूक आणि सहकाऱ्यांना मदत केल्याबद्दल सॅम्युअलला ‘स्टुडंट ऑफ द मंथ’ पुरस्कार मिळाला.

त्यांनी फेसबुकवर ही माहितीही टाकली. लिहिले-‘गैरहजेरीच्या वादाआधी एप्रिलमध्ये जिल्हा समितीने सॅम्युअलची या पुरस्कारासाठी निवड केली होती. माझ्या पालनपोषणात काही कमतरता असेल तर कदाचित हा पुरस्कार सॅम्युअलला मिळाला नसता.’ त्यानंतर जॉर्जियाची राष्ट्रीय पालक संघटना त्यांच्या समर्थनार्थ आली असून प्रशासनाच्या विरोधात खटला लढण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करत आहे. प्रकरण कोर्टात असून निकाल जुलैत लागेल.
बातम्या आणखी आहेत...