आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदर तेरेसांना सप्टेंबरमध्ये संतपद, व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांनी केली घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅटिकन सिटी/ कोलकाता - संपूर्ण जीवन रुग्ण व गरिबांच्या सेवेसाठी समर्पित करणाऱ्या नोबेल विजेत्या मदर तेरेसा यांना ४ सप्टेंबर रोजी संतपद बहाल करण्यात येणार आहे. पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी ही घोषणा केली. याबाबतचे पत्र कोलकात्यातील "मदर्स हाऊस'ला प्राप्त झाले.

मदर तेरेसा यांनी ४५ वर्षे भारतातील गरीब आणि उपेक्षित लोकांच्या सेवेसाठी घालवली. १९९७ मध्ये त्यांचे निधन झाले. भारतातील रुग्ण व अनाथांच्या सेवेसाठी त्यांनी जीवन समर्पित केले होते. ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च श्रद्धास्थान व्हॅटिकन सिटीचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांनी गेल्या वर्षी १७ डिसेंबरला तेरेसांच्या दुसऱ्या चमत्काराला मान्यता देत त्यांच्या संतपदाचा मार्ग मोकळा केला होता. ब्राझीलमधील एका व्यक्तीला मेंदूचा विकार होता. तो बरा व्हावा म्हणून त्याच्या पत्नीने तेरेसांकडे प्रार्थना केली. यानंतर तो रुग्ण चमत्कारिकरीत्या बरा झाला होता. हा चमत्कार पोप फ्रान्सिस यांनी मान्य केला.
व्हटिकन सिटीत होणार समारोह
रोममध्ये होत असलेल्या संतपद बहालीच्या या सोहळ्याला विशेष महत्त्व असेल, असे कोलकात्यातील मदर हाऊसच्या नन्सनी म्हटले आहे. कारण, मदर तेरेसा यांच्या कार्याची जगभर ख्याती आहे. सिस्टर प्रेमा व आर्चबिशप डिसोझा या सोहळ्यास उपस्थित राहतील.

मॅसेडोनिया ते भारत...
१९१० मध्ये मॅसेडोनियामध्ये जन्मलेल्या मदर तेरेसा वयाच्या अठरा वर्षांनंतर काही दिवस आयर्लंडमध्ये स्थलांतरित झाल्या. तेथे काही वर्षे वास्तव केल्यानंतर त्या भारतात आल्या. नंतरचे बहुतांश आयुष्य त्यांनी भारतातच घालवले. १९५१ मध्ये त्यांना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले होते.