आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुगाबे यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरूनही हकालपट्टी; एमर्सन मनंगावा पक्षाध्यक्षपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिम्बाब्वेत शांतता राहावी यासाठी रविवारी हजारो नागरिकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. या वेळी ढोलच्या तालावर गाणी गायली गेली. - Divya Marathi
झिम्बाब्वेत शांतता राहावी यासाठी रविवारी हजारो नागरिकांनी चर्चमध्ये प्रार्थना केली. या वेळी ढोलच्या तालावर गाणी गायली गेली.

हरारे- झिम्बाब्वेच्या जनू-पीएफ या सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदावरूनही आता राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांची हकालपट्टी झाली आहे. मुगाबे यांनी बडतर्फ केलेले माजी उपाध्यक्ष एमर्सन मनंगावा यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाली आहे. हरारेत झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाच्या एका प्रतिनिधीने ही माहिती दिली.  


मुगाबे यांची पक्षाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यासाठी झिम्बाब्वेतील सत्तारूढ जनू-पीएफ पक्षाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. तीत हा निर्णय झाला. ९३ वर्षीय मुगाबे यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून बाजूला व्हावे यासाठी शनिवारी राजधानी हरारे येथे हजारो नागरिकांनी शांततेत निदर्शने केली होती. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक रविवारी झाली. मुगाबे यांना परत बोलावण्याचा निर्णय जाहीर होताच सर्व सदस्यांनी जागेवर उभे राहून आनंद व्यक्त केला.  


दरम्यान, झिम्बाब्वेच्या संसदेचे अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत असून, या अधिवेशनात अध्यक्ष मुगाबे यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल होऊ शकतो, असे संकेत एमडीसी-टी या प्रमुख विरोधी पक्षाच्या संसदीय पक्षाचे मुख्य प्रतोद गोनेसे यांनी दिले आहेत. गोनेसे म्हणाले की, मंगळवारपर्यंत मुगाबे यांनी राजीनामा गिला नाही तर त्यांच्यावर महाभियोग दाखल होऊ शकतो. त्याबाबत आमच्या पक्षाने जनू-पीएफ पक्षाशी चर्चा केली आहे. संयुक्तरीत्या महाभियोग दाखल करण्यात येईल.  


दुसरीकडे, बंड केल्याचा आरोप टाळण्यासाठी लष्कर मुगाबे यांच्याशी चर्चा करत आहे. लष्कराचे कमांडर कॉन्स्टंटिनो चिवेंगा यांची मुगाबेंशी दुसऱ्या फेरीची चर्चा झाली. मुगाबे मात्र पुढील वर्षापर्यंत राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. लष्कर आणि मुगाबे यांच्यातील चर्चेची माहिती लष्कराने दिली नाही. पण मुगाबे यांनी स्वत:हून पायउतार व्हावे, अशी लष्कराची भूमिका असल्याचे समजते. संभाव्य न्यायालयीन कारवाईपासून आपल्याला तसेच कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, यासाठी मुगाबे आग्रही असल्याचेही वृत्त आहे.  


मुगाबे आणि लष्कर यांच्यात चर्चेच्या पहिल्या फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे शिष्टमंडळही सहभागी झाले होते. मात्र, दुसऱ्या फेरीच्या वेळी शिष्टमंडळ दिसले नाही. 

 

मुगाबे योग्य निर्णय घेतील : मुत्संगवा  
मुगाबे स्वत:हून पायउतार होतील, अशी अपेक्षा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख नेते ख्रिस मुत्संगवा यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, देशातील लाखो लोक मुगाबेविरोधी निदर्शनांत सहभागी झाले होते. त्यामुळे मुगाबे योग्य निर्णय घेतील, अशी आमची अपेक्षा आहे. निदर्शकांवर गोळीबार होणार नाही याची काळजीही घेतली जावी.

बातम्या आणखी आहेत...