आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

म्यानमारने समुद्रातून सुखरूप काढले ७०० रोहिंग्या मुस्लिम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता/मॉन्गदौ - अनेक दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या रोहिंग्या मुस्लिमांतील ७०० जणांना म्यानमारने वाचवले आहे. रोहिंग्यांसाठी ‘बोट पीपल’ हे संबोधन रूढ झाले आहे. हे लोक छोट्या छोट्या बोटींतून विविध देशांत आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात. सध्या २ हजारांपेक्षा जास्त निर्वासित समुद्रात अडकले असण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे.
म्यानमारने या निर्वासितांना आपला पासपोर्ट देऊन नागरिकत्व बहाल करावे असे अमेरिकेचे परराष्ट्र राज्यमंत्री एन. रिचर्ड यांनी सुचविले आहे. म्यानमारमध्ये त्यांना नागरी हक्क देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. मात्र, म्यानमारने त्यांच्या मूळ स्थानाविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. ते बांग्लादेशीही असू शकतात, असे म्यानमारने म्हटले आहे. शुक्रवारी अंदमान समुद्रात अडकलेल्या एका जहाजाला म्यानमारच्या नौदलाने वाचवले. त्यातील ७२७ प्रवाशांची सुटका केली. त्यांना म्यानमारच्या पश्चिम किना-यावरील रकेन येथे आश्रय देण्यात आला. यापूर्वी अशाच नौकांमधून ४००० निर्वासित रोहिंग्या इंडोनेशिया, मलेशिया, थायलंडच्या किना-यांवर आश्रयाला आले होते.

११ लाख निर्वासित नागरिक नाहीत : म्यानमार
म्यानमारमध्ये नोव्हेंबरात निवडणुका आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी मतपेटीच्या राजकारणात नेते पुरते अडकले आहेत. रोहिंग्या नागरिकच नसल्याने मतदानही करू शकत नाहीत. त्यामुळे निर्वासितांच्या प्रश्नांकडे राजकीय नेतृत्वाचे दुर्लक्षच सुरू आहे. मुख्य विरोधी पक्षनेत्या व नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू की यांनीही रोहिंग्याप्रकरणी मौनच पाळले आहे.

रोहिंग्या कोण आहेत?
रोहिंग्या हे इंडो-आर्यन वंशाचे मानले जातात. म्यानमारच्या रकेन प्रांतातील हे मूळ निवासी आहेत. रोहिंग्या ही त्यांची भाषा असून ब्रिटिश शासन काळात ते बांगलादेशातून म्यानमारमध्ये विस्थापित झाल्याचे इतिहास तज्ज्ञांचे मत आहे. काही लोक १९४८ मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तर काही १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळी रकेनला स्थायिक झाले. म्यानमारमध्ये सध्या ११ लाख रोहिंग्या मुस्लिम आहेत. जनरल विन सरकारच्या कार्यकाळात १९८२ मध्ये त्यांना म्यानमारचे नागरिक मानण्यास नकार दिला होता. तेव्हापासून यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा प्रलंबित आहे.