आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाम परिषद : १२० देशांच्या बैठकीमध्ये पाक एकाकी, भारताकडून पोलखोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरलामर - व्हेनेझुएलात सुरू असलेल्या १२० देशांच्या बैठकीत रविवारी पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात मुद्द्यावर एकाकी पडला होता. भारताने शेजारी राष्ट्राकडून केल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या समर्थनाची आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पोलखोल केली.
१७ व्या अलिप्ततावादी १२० देशांच्या परिषदेत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी झाले आहे. दुसरीकडे बैठकीत रविवारी भारताने शेजारी राष्ट्राची पोलखोल केल्यामुळे पाकिस्तान एकाकी पडला होता. आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घेऊन ठोस कृती करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी दहशतवादाचे उच्चाटन करणारी यंत्रणा गरजेची आहे, असे मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केले आहे. सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात मानवी हक्काचे उल्लंघन करणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत. आता दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी एकजुटीने संघर्ष करण्याची वेळी आहे. दहशतवादाला पराभूत करण्यासाठी परस्पर सहकार्य, सुरक्षा, सार्वभौमत्व विकासावर भर देण्याची गरज आहे. सध्या जगावरील सर्वात मोठा धोका म्हणजे दहशतवाद आहे. त्याचा फटका आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता, सार्वभौमत्वाला बसू लागला आहे, असे अन्सारी यांनी सांगितले.
कठोर कायदा असावा
अलिप्ततावादी चळवळीतील देशांनी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय कायद्यात योग्य बदल करावा. जेणेकरून कठोर कायद्याद्वारेही दहशतवादाचा बिमोड करता येऊ शकेल. कठोर कायद्याच्या साह्याने संघटनेतील देश परस्परांना सहकार्य करू शकतील. सध्याची कायदेशीर रचना दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्याच्या वाटेतील मुख्य अडथळा आहे, याकडेही अन्सारी यांनी लक्ष वेधले.
मार्गारिटा जाहीरनामा मंजूर
नामच्या बैठकीत दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी मार्गारिटा जाहीरनाम्याच्या मसुद्याला सदस्य राष्ट्रांनी एकमुखाने मंजुरी दिली. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात होणाऱ्या दहशतवादाच्या विरोधात एकजुटीने लढण्याविषयी आमची बांधिलकी असल्याचे देशांनी स्पष्ट केले. त्यासंबंधीचा अंतिम जाहीरनामा नंतर घोषित केला जाणार आहे. तत्पूर्वी, परिषदेत सहभागी पाकिस्तान एकटे पडल्याचे दिसून आले. दहशतवादावरील सहमतीला पाकिस्तानच्या प्रतिनिधी तसनीम अस्लम यांनी विरोध दर्शवला होता.
‘अमेरिकेने हस्तक्षेप करू नये’
अलिप्ततवादी चळवळीच्या कामात अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा बैठकीचे यजमान व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुराे यांनी दिला आहे. शनिवारी बैठकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला आहे. त्या शिवाय मदुरो यांचे सहकारी क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राआेल कॅस्ट्रो यांनी देखील अमेरिकेला सुनावले आहे. अमेरिका या प्रदेशात पुन्हा एका वसाहतवाद आणू इच्छिते, असा आरोपही उभय नेत्यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...