आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Discussion Of The Indian In Malaysia

स्वातंत्र्यलढ्यात सुभाषबाबूंसह तामिळ लोकांचे अमूल्य योगदान - नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मलेशियामध्ये भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधला. मलेशिया एक्झिबिशन व कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस व तमिळ लोकांच्या अमूल्य योगदानाची आठवण करून दिली. "मोदी... माेदी'च्या गजरात भारतीयांनी त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमात प्रवासी भारतीयांसह सुमारे ९० सांस्कृतिक संघटनांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला सुमार २० हजार भारतीयांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत विशिष्ट सीमांमध्ये वसलेला नाही. जगात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांत व तुमच्यातही तो वसलेला आहे. तमिळ लोकांनी भारताच्या विकासात दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले ओह. तुम्ही देशापासून दूर आहात आणि तुमच्याकडे वेळ नाही म्हणून भारताबद्दल तुमच्या मनात असलेले प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. मलेशियात राहणाऱ्या या भारतीयांबद्दल माझ्या मनात कायम प्रेमभावना आहे.'
दहशतवादाविरुद्ध नवी रणनीती हवी
आशियान परिषदेत बोलताना रविवारी मोदींनी दहशतवादाशी लढण्यासाठी नवी रणनीती गरजेची असल्याचे स्पष्ट केले. यात कुठेही राजकीय विचार केला जाऊ नये. दहशतवादाचा वापर किंवा त्याचे समर्थन कोणत्याही देशाने करू नये, असे मोदी म्हणाले. पॅरिस, अंकारा, मालीमध्ये झालेले हल्ले असोत किंवा रशियन विमान स्फाेटाने उडवून देण्याची घटना असो, दहशतवाद जगभर धोका ठरत असल्याचे मोदी म्हणाले.
सांस्कृतिक केंद्राला नेताजींचे नाव
क्वालालाम्पूरमध्ये लवकरच भारत एक सांस्कृतिक केंद्र उभारत आहे. या केंद्राला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिले जाणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली. ते म्हणाले, मलेशिया आणि भारत या दोन्ही देशांनी वसाहतवादाचे चटके सोसलेले आहेत. याविरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली हजारो लोक स्वातंत्र्यलढयात सहभागी झाले. तन-मन-धनाने ते देशासाठी लढले. अनेक ज्ञात-अज्ञात लोकांनी या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, असे नमूद करून मोदींनी या लोकांच्या पुढच्या पिढीला धन्यवाद दिले.
विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण
रविवारी दुपारी मोदी यांच्या हस्ते रामकृष्ण आश्रमात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. वेद-पुराणापासून विवेकानंदांपर्यंत भारताला मोठी सांस्कृतिक परंपरा असल्याचे नमूद करून विवेकानंद हे भारताचा आत्मा असल्याचे मोदी म्हणाले. "एक आशिया' ही संकल्पना सर्वप्रथम त्यांनीच मांडल्याची आठवण त्यांनी करून दिली. आज आशियान परिषदेत त्याच संकल्पनेवर आपण विचार करत असल्याचे ते म्हणाले.
गांधीजींची आठवण...पुतळा उभारणार
महात्मा गांधी कधी मलेशियात आले नाहीत. मात्र, त्यांनी आपल्या कार्यातून कायम या देशातील लोकांच्या मनात घर केले होते, असे मोदी म्हणाले. गांधी यांच्या स्मरणार्थ उभारल्या गेलेल्या सभागृहात महात्मा गांधी यांचा पुतळा उभारला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले, आज दहशतवाद जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक आव्हान ठरत आहे. हा दहशतवाद निपटून काढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.