आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल वाजवून मोदी यांचे स्वागत, ३३ अमेरिकी खासदारांचेही पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- अमेरिकेच्या दुसऱ्या दौऱ्यावर दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी येथील भारतीय समुदायाकडून ढोल-नगारे वाजवून स्वागत करण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी मोदी येथे आले आहेत. या दौऱ्यात मोदी यांचा भर ‘मेक इन इंडिया’ आणि ‘डिजिटल इंडिया’सारख्या योजनांना प्रोत्साहन देण्यावर असेल.

जगातील बड्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अनेक राष्ट्रप्रमुखांशीही ते चर्चा करतील. एकाच हॉटेलमध्ये उतरूनही पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा होणार नाही. ते आयर्लंडहून न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले. राजदूत अरुणकुमार सिंह, संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी अशोक मुखर्जी तसेच वाणिज्यदूत ज्ञानेश्वर मुळे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. तेथून ते वॉल्डाॅर्फ एस्टोरिया हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलची सजावट भारतीय परंपरेनुसार करण्यात आली होती. हॉटेलबाहेर ५०० हून अधिक लोक ढोल-नगारे वाजवून त्यांना अभिवादन करत होते. गर्दी वाढल्याने मोदींना गुप्तहेर विभागाचे अधिकारी सुरक्षा कड्याने त्यांच्यात घेऊन गेले. मोदींचे समर्थक ‘मोदी, मोदी’ अशी घोषणाबाजी करत होते. त्यांच्या आगमनानिमित्त आनंदात मिठाईदेखील वाटण्यात आली. मोदी फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या प्रमुखांनादेखील भेटणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी मोदी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास संमेलनाला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचे आयोजन संघटनेचे सरचिटणीस बान की मून यांनी केले आहे. २६ रोजी भारताच्या वतीने जी-४ देशांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्कोइस आेलांद, भूतान, स्वीडन, गयाना, सायप्रस यांच्यासह ब्राझील, जपान, जर्मनी यांच्या प्रमुखांशीदेखील चर्चा करतील. २८ रोजी मोदी-आेबामा यांची भेट होईल; परंतु मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कैलाश खेरचे सूर व्हॅलीमध्ये घुमणार
प्रसिद्ध सुफी गायक कैलाश खेरच्या सुरांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कॅलिफोर्नियातील या कार्यक्रमाकडे भारतीय समुदायाचे लक्ष लागले आहे. आपल्या आगामी कार्यक्रमाची माहिती देणारा कैलाश खेरचा एक व्हिडिआे सध्या अमेरिकेत चर्चेत आला आहे. त्यामुळे सर्वांनाच कार्यक्रमाची उत्सुकता वाटू लागली आहे. ४२ वर्षीय खेर हे मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेचे राजदूतदेखील आहेत. बॉलीवूडसाठी सुमारे ५ हजार गाणी गाणाऱ्या खेर यांचा कैलासा बँड जगभरात लोकप्रिय आहे. कैलासाचे गेल्या दहा वर्षांत जगभरात आतापर्यंत १ हजारांवर कार्यक्रम झाले आहेत.
भारतीयांशी संवाद, अश्विनी भावे करणार सूत्रसंचालन
सॅन जोस येथे रविवारी मोदी भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा मान मराठी-हिंदी अभिनेत्री अश्विनी भावे यांना मिळाला आहे. कार्यक्रमाला सुमारे १८ हजार भारतीयांची उपस्थिती राहील. सॉफ्टवेअर इंजिनिअरशी विवाह केल्यानंतर अश्विनी भावे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये स्थायिक झाल्या. कार्यक्रमात त्यांच्या जोडीला लोकप्रिय भारतीय-अमेरिकन कॉमेडियन राजीव सत्याल, टीव्ही पत्रकार राज मथाईदेखील असतील.
संधींची भूमी : काँग्रेसच्या ३३ सदस्यांनी पंतप्रधानांना संयुक्त पत्र पाठवले आहे. सिलिकॉनची भेट उद्यमशीलता आणि संस्कृतीमध्ये नवा अध्याय जोडेल, असा विश्वास अमेरिकेच्या खासदारांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.