आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NASA's Curiosity Rover Captures Stunning Mars Sunset News In Marathi

नासाने टिपला मंगळावरील निळा सूर्यास्त, आकाश मात्र धुळीने आच्छादलेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- नासाच्या मंगळ मोहिमेवर असलेल्या क्युरिऑसिटी यानाने अत्यंत नयनरम्य व अद्भुत दृश्ये टिपली आहेत. लाल ग्रहावरील सूर्यास्ताची दृश्ये या रोव्हरद्वारे टिपण्यात आली. लाल ग्रहाच्या क्षितिजावरील निळी सूर्यास्त किरणांची ही दृश्ये स्तब्ध करणारी व मन मोहरून टाकणारी आहेत.
मंगळावरील सूर्यास्त होतानाच्या या छायाचित्रांमध्ये क्षितिज निळ्या रंगाच्या विविध छटांची उधळण करताना दिसत आहे. क्युरिऑसिटी ही छायाचित्रे नासाच्या केंद्रात आली आहेत. १५ एप्रिल रोजी रोव्हरच्या मास्टकॅमने ही दृश्ये टिपली. या फोटोशूटच्या वेळी धुळीचे लोट उडतानाही दिसत आहेत. मंगळाचे अवकाश या धुळीने भरलेले या छायाचित्रात दिसते.
संशोधनाच्या दृष्टीने छायाचित्र ठरेल महत्त्वपूर्ण
या छायाचित्रांमुळे मंगळाच्या कक्षेत विविध स्तरावर धुळीची किती घनता आहे, याचा उलगडा करता येणे शक्य आहे. मंगळाच्या वातावरणाचे स्तर व त्यातील धुळीची घनता असे विश्लेषणही सूर्यकिरणांमुळे अधिक अधोरेखित व सुस्पष्ट झाली आहे. निळ्या प्रकाशाचा व धुळीचा परस्पर संबंधही यामुळे उलगडू शकतो, असे संशोधक मार्क लेमॉन यांनी सांगितले. मंगळाच्या पृष्ठभागावर निळ्या रंगाचा गडदपणा सूर्याच्या दिशेने जास्त आढळून येत आहे. याची कारणे या छायाचित्रामुळे शोधता येऊ शकतील. शिवाय, यातील घटकही कळू शकतील.
पृथ्वीपेक्षा वेगळे, अद्भुत दृश्य
पृथ्वीवरही सूर्यास्ताच्या वेळी आकाशात अनेक रंग दिसतात. मंगळावर मात्र सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या आजूबाजूला निळी प्रभा दिसून आली. दिवसाच्या सूर्यप्रकाशात येथील भूमीवर करडा प्रकाश असतो. ऑगस्ट २०१२ पासून क्युरिऑसिटी यान मंगळावरील वातावरणाचे अध्ययन करत आहे. मंगळावर पूर्वी कधी पाणी होते का, यासाठीही हे यान संशोधन करत आहे.