आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या राजीनाम्याने ट्रम्प यांना झटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रशासनिक स्तरावर पहिला मोठा झटका बसला. रशियाशी असलेल्या संबंधांविषयी व्हाइट हाऊसला खोटे बोलल्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ले. जन. मायकल फ्लिन यांनी मंगळवारी राजीनामा दिला.
 
माध्यमांच्या वृत्तांत म्हटले होते की ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ ग्रहण करण्यापूर्वी फ्लिन यांनी रशियन राजदूताशी दिर्घ चर्चा केली होती. फ्लिन यांनी ही माहिती खोटी असल्याचा दावा केला होता. आता राजीनामा देताना फ्लीन यांनी लिहिले आहे की त्यांनी व्हाइट हाऊस आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांना अर्धवट माहिती दिली होती.

५८ वर्षीय फ्लिन यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकांपूर्वीच ट्रम्प यांना समर्थन दिले होते. ते आधुनिक अमेरिकेच्या इतिहासात सर्वात कमी काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी राहिले. केवळ ३ आठवडे ते या पदावर होते. त्यांच्या जागी आता निवृत्त ले. जन. जोसेफ कीथ कॉलेग यांना प्रभारी सल्लागार नियुक्त केले आहे. १९६७ ते २००३ दरम्यान ते अमेरिकन सैन्यात होते.व्हिएतनाम युद्धात ते लढले. सैन्यातील अनेक पदके त्यांनी मिळवली आहेत.
 
राजीनामा देताना फ्लिन यांनी ट्रम्प प्रशासनाची प्रशंसा केली असून हे मजबूत प्रशासन असल्याचे म्हटले आहे. राजीनामा सादर केल्यानंतर फ्लिन म्हणाले की त्यांनी राष्ट्राध्यक्ष आणि उप राष्ट्राध्यक्षांची माफी मागितली. त्यांनी ती स्विकारली असून दोघांनी यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. व्हाइट हाऊसनेही त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण आहे. 
 
छाप्यांमध्ये १००० पेक्षा अधिक अटकेत
अमेरिकेचा इमिग्रेशन विभाग अवैधरीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध अभियान राबवत आहे. यात १००० पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. होमलँड सुरक्षा मंत्री जॉन केली यांनी ही माहिती दिली. अटक केलेल्यांपैकी ७५% गुन्हेगार आहेत. 
 
केवळ तीन मतांनी अर्थमंत्री स्टीव्हन विजेते
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थमंत्री पदासाठी स्टीव्हन टी. मनूचिन यांचे नाव सुचवले होते. स्टीव्हन गोल्डमन साक्सचे बँकर आणि हॉलीवूड चित्रपटांचे फायनान्सर होते. सिनेटमध्ये त्यांच्या बाजूने ५३ आणि विरोधात ४७ मते पडली. ट्रम्प यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून हे पद रिक्त आहे. जी-२० देश ट्रम्प यांचे धोरण जाणण्यास उत्सुक होते. मनूचिन यांना उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांनी पदाची शपथ दिली.
बातम्या आणखी आहेत...