काठमांडू - भूकंपग्रस्तांसाठी देशातून आणि देशाबाहेरून मदतीचा ओघ सुरू आहे. प्रत्येक जण
आपआपल्या परीने यात योगदान देत आहे. याचाच एक भाग म्हणून नेपाळच्या प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिरातील एक पुजारी मदत मिळवण्यासाठी गायक झाला आहे. राजभंडारी पुजारी कुटुंबातील ३३ वर्षीय सुईल हातात गिटार घेऊन गाणे गात उपस्थितांना मदतीचे आवाहन करत आहे.
सुईल गेल्या काही दिवसांपासून सकाळी ६.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत पशुपतिनाथ मंदिरात गाण्याचे कार्यक्रम करतो.चला मित्रांनो नेपाळला मदत करू, या आशयाची तो गीत सादर करत आहे. पर्यटकांचा स्थानिक गाइड बिस्सा बाबाने या कामात त्याला साथ दिली आहे. बिस्सा बाबा सुईलच्या गाण्याला लाकडी वाद्यावर साथसंगत करतो. विशेष म्हणजे दोघे जण पैशाच्या स्वरुपात मदत स्वीकारण्यास नकार देतात. त्याऐवजी ते कपडे, वस्तूच्या रुपात मदत करण्याचे आवाहन करतात.
नेपाळीने नेपाळीची मदत केली पाहिजे
सुईल सातवीत असल्यापासून गिटार वाजवितो. भूकंपाच्या या कठीण प्रसंगात देशवासींना बळ देण्याची ही वेळ आहे. मदत सामग्री जमा झाल्यानंतर दुर्गम भागातील गावांना ती वितरित केली जाईल, असे सुईल यांनी सांगितले. ३१ वर्षीय बिस्साला नेपाळीशिवाय १३ भाषा येतात. पशुपतिनाथावरील श्रद्धेतून लोकांनी या काळात एकत्र येण्याचे आवाहन बिस्सा करतो. नेपाळीहून नेपाळी म्हणजे एका नेपाळीने दुस-या नेपाळीची मदत केली पाहिजे या आशयाच्या गाण्यातून सहा दिवसांत धान्य, औषधे जमा केली असून भूकंपग्रस्त गावांना ती पोहोचवली जाणार असल्याचे बिस्साने सांगितले.
मृतांचा आकडा ७,७०० : नेपाळमधील भूकंपातील मृतांची संख्या ७ हजार ७०० वर पोहचली आहे. खराब हवामानामुळे मदतकार्यातही अडथळे येऊ लागले आहेत.
नेपाळमधील अब्जाधीश १० हजार घरे बांधणार
नेपाळमधील अब्जाधीशांनी भूकंपग्रस्तांना दहा हजार घरे बांधून देण्याचा निर्धार व्यक्त केला असून या कामात भारतातील सेवाभावी संघटनेकडून तांत्रिक मदतीची मागणी केली आहे. चौधरी ग्रुप १ हजार घरे बांधून देणार असून उर्वरित दात्यांच्या माध्यमातून सहा महिन्यांत ९ हजार घरे बांधली जातील, असे चौधरी फाउंडेशनचे चेअरमन बिनोद चौधरी यांनी सांगितले. चौधरी फाउंडेशनला भारतातील सस्टेनेबल इन्व्हार्नमेंट अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट सोसायटी(एसईईडीएस) तांत्रिक मदत करणार आहे.