आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संशोधन : खाद्य पदार्थ टिकवण्यासाठी निळा प्रकाश लाभदायी, जिवाणू नष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - खाद्य पदार्थ अिधक काळ टिकावेत म्हणून आजवर अनेक प्रयोग झाले. प्रामुख्याने रासायनिक प्रिझर्व्हेटिव्हचा वापर करण्याची एक प्रचलित पद्धत आहे. मात्र, आगामी काळात याचीसुद्धा गरज राहणार नाही. कारण, निळ्या प्रकाशात पदार्थ नासवणारे जिवाणू (बॅक्टेरिया) नष्ट करण्याची क्षमता असल्याचे एका संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. यामुळे प्रिझर्व्हेटीव्हचा वापर न करता खाद्य पदार्थ कित्येक दिवस सुरक्षित राहू शकतील.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या संशोधकांनी निळ्या एलईडीचा वापर करून केलेल्या प्रयोगात असे आढळून आले की, हा निळा प्रकाश अगदी प्रिझर्व्हेटीव्हसारखेच कार्य करतो. साधारणत: खाद्यपदार्थांवर उष्ण किंवा दमट वातावरणात विषाणूंमुळे जो परिणाम होतो तो निळ्या प्रकाशात ठेवलेल्या खाद्यपदार्थांवर होत नाही.

थंड वातावरणात अधिक प्रभावी : हा निळा प्रकाश थंड वातावरणात ठेवलेल्या खाद्य पदार्थांवर अधिक गुणकारी आहे. ४ ते १५ अंश सेल्सिएस तापमानात ठेवलेल्या पदार्थांवर हा निळा प्रकाश असेल तर विषाणू नष्ट होतात. आंबट पदार्थांवरही निळा प्रकाश तेवढाच प्रभावी ठरतो. म्हणूनच फळांचे ताजे काप निळ्या प्रकाशात ठेवले तर त्याला बॅक्टेरियाची बाधा होत नाही.
हल्ली हवाबंद खाद्यपदार्थ जगभर मिळतात. अशा खाद्यान्नाची मागणीही खूप आहे. मात्र, बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये ते टिकून राहावेत म्हणून रासायनिक प्रिझर्व्हेटीव्हजचा वापर केला जातो. यामुळे या खाद्य पदार्थांची नैसर्गिक चव व गुणधर्म कमी होतात. आगामी काळात ही चव कायम राहू शकते. त्यामुळे गिर्यारोहण किंवा दुर्गम भागात विषाणुंमुळे अन्नाची नासाडी टाळता येऊ शकेल. त्याचा उपयोग लष्करी मोहिमांमध्येही होऊ शकतो.
संशोधन क्रांतिकारी
नैसर्गिक खाद्यपदार्थांची मागणी व गरज पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे संशोधन निश्चितपणे लाभदायी ठरणार आहे. निळ्या एलईडीमुळे बॅक्टेरिया तयार करणाऱ्या पेशीच नष्ट होतात.
यूक ह्यून-ग्यून, मुख्य संशोधक

निळा एलईडी उपयुक्त
जिवाणूंच्या पेशींमध्ये प्रकाशकिरणांना शोषून घेण्याचा खास गुणधर्म असतो. हे प्रकाशकिरण निळ्या रंगांचे असतील तर जिवाणूंमधील पेशींची क्षमता आपोआप कमी होत जाते आणि या पेशी नष्ट होतात. म्हणून फ्रिजमध्ये अशा निळ्या रंगाचा वापर केला तर पदार्थाचे आयुष्य वाढेल.