आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुल्या आकाशात आता मानवाचे पक्षी उड्डाण, १ हजार मीटर उंचीवर उडू शकणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - दीर्घकाळापासून जेटपॅकची वाट पाहत असलेल्यांसाठी शुभवार्ता आहे. पुढच्या वर्षीपासून जेटपॅकची बाजारात विक्री होणार आहे. तब्बल ३५ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कंपनीने "द मार्टिन जेटपॅक'ची रचना केली असून आता त्यास परवानाही मिळाला आहे. याची सुमारे १ कोटी रुपये किंमत असण्याची शक्यता आहे. ग्लेन मार्टिन यांच्या या कंपनीने २०११ मध्ये जेटपॅकची चाचणी घेतली होती. तेव्हा त्याने सुमारे १ हजार मीटर उंचीपर्यंत उड्डाण घेतले होते. खाली उतरण्यासाठी पॅराशूटचा वापर करण्यात आला. मात्र, पॅरिसमध्ये आयोजित एअर शोमध्ये कंपनीने याचे नवे लूक सादर केले आहे.

अनेक बदल करण्यात आले
सध्याच्या जेटपॅकमध्ये २०० एचपीचे व्ही-४ इंजिन असून त्याद्वारे दोन डक्ट फॅन चालू शकतात. एक हजार मीटरच्या उंचीवर ताशी सुमारे ७४ किलोमीटर वेगाने उड्डाण घेण्याची यात क्षमता आहे. शिवाय, त्यावर १२० किलोपर्यंत वजनही वाहून नेता येऊ शकते.

बचावकार्यात होईल मदत
जेटपॅक वरकरणी जरी साहसी उपकरण वाटत असले तरी याचा वास्तविक उपयोग बचावकार्यासाठी होणार आहे. व्हिटीओएल सिस्टिममुळे जेटपॅक हेलिकॉप्टरप्रमाणे जागेवरूनच उड्डाण भरू शकतो. यात छतावर उतरण्याचीही क्षमता असून कमी जागेतूनही निघू शकते.

नजर भारतावर
पॅरिस |व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्टिन एअरक्राफ्टची कंपनी भारतास महत्त्वाची बाजारपेठ समजत आहे. त्यासाठीच कंपनी दक्षिण आशियाई देशांत विभागीय विक्री कार्यालय उघडण्यासाठी भारतीय कंपन्यांसोबत वाटाघाटी करत आहे. कंपनीचे सीईओ पीटर कोकर यांनी सांगितले की, मार्टिन जेटपॅकचा उपयोग शोध व बचाव कार्यासाठी केला जातो.

पायलट सुरक्षित
कम्पोझिट स्ट्रक्चरपासून तयार पायलट मॉड्यूलमुळे अापत्कालीन स्थितीतील पायलटचा सहज बचाव होऊ शकतो. जेटपॅकमध्ये बॅलिस्टिक पॅराशूट सिस्टिम बसवण्यात आली आहे. या सिस्टिममुळे जेटपॅकची जमिनीशी होणारी धडक टळू शकते. हे उपकरण पायलटला पूर्वसूचना देण्यसाठीही सक्षम असल्यामुळे सुरक्षितता राहते.