आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोसूल हस्तगत झाल्यास इसिसचा मोठा पाडाव, अमेरिकेच्या नेतृत्वात महाकारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - इसिसच्या तावडीतून ऐतिहासिक शहर मोसूलची सुटका करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली महालष्करी कारवाईला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मोसूलला दहशतवाद्यांच्या विळख्यातून बाहेर काढल्यास तो इसिसचा मोठा पाडाव ठरेल, असे मत अमेरिकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, आघाडीचे सैन्य मजल दरमजल करत शहराच्या दिशेने घुसण्याचा प्रयत्न करत आहे.

इसिसच्या विरोधातील ही निर्णायक लढाई ठरू शकते. त्यासाठी मोसूलवर इराकसह अमेरिकी सैन्याने चढाई केली आहे. ४० हजारांवर सैनिक शहरात घुसल्याने भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. शहरातील लोकसंख्या १५ लाखांवर आहे. त्यांची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. इराकमधील दुसरे मोठे शहर असलेल्या मोसूलमध्ये सुमारे ७ हजारांवर दहशतवादी दडून बसल्याची माहिती आहे. त्यांना ठार करण्यासाठी ही कारवाई असल्याचे व्हाइट हाऊसचे प्रसारमाध्यम विभागप्रमुख जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले. मोसूलवरवरील कारवाई पूर्ण होण्यासाठी काही आठवडे देखील लागू शकतात, असा अंदाज आहे.

इराक सरकारला पाठिंबा
इराकमधील बंडखोरांच्या विरोधातील लढाईत अमेरिकेसह ६७ देशांच्या आघाडीने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्या माध्यमातून इसिसपासून देशाची मुक्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वेळोवेळी कारवाया केल्या जातात. अमेरिकेची ही कारवाई आणखी काही महिने चालू शकते.
हल्ल्यासाठी अनेक महिन्यांपासून तयारी
इसिसने मोसूलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने मोसूल शहर रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावर चढाई करून त्यांना हुसकावण्यात यश आल्यास इसिसच्या विरोधातील ही निर्णायक अशी लष्करी खेळी ठरू शकेल. इसिसच्या ताब्यात रमादी व तिकरीत ही शहरे देखील आहेत. मोसूलच्या कारवाईसाठी इराक व अमेरिका यांच्या सैन्यांत गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी सुरू आहे. त्यात यश आल्यास रमादी व तिकरीत शहरांकडे लक्ष वळवण्यात येईल, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...