आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US: चेहरा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया, व्हर्च्युअल प्लॅनिंग तंत्र-थ्री डी प्रिंटिंगचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 वॉशिंग्टन - अमेरिकेत ३२ वर्षीय व्यक्तीवर चेहरा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या व्यक्तीला अन्न चावणे, बोलणे आणि श्वसनाचा त्रास होता. आता या सर्व क्रिया ती व्यक्ती सहज करू शकेल, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. वयाच्या २१ व्या वर्षी अँड्रयू सँडनेस याचा चेहरा गोळी लागल्याने विद्रूप झाला होता. त्याला धड अन्नग्रहण करता येत नव्हते. वास घेण्याची क्षमताही क्षीण झाली होती. गोळीची जखम खोल असल्याने अँड्रयू स्पष्टपणे बोलू शकत नव्हता.  
 
५० तास शस्त्रक्रिया सुरू होती. वर्ष २०१६ मध्ये या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली होती. टप्प्याटप्याने ती करण्यात आली. यासाठी ५० तासांपेक्षा अधिक वेळ लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाक, जबडा, टाळू, दात, गाल, चेहऱ्याचे स्नायू, मौखिक त्वचा, अन्ननलिकेतील ग्रंथी आणि चेहऱ्याची त्वचा या विविध अंगांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ही प्रक्रिया परस्परांत गुंतलेली होती.  
 
शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सँडनेसच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. तो या महिनाअखेरीस आपल्या व्योमिंग येथील घरी परतू शकेल. 
 
सामान्य आहार घेऊ शकतो
मी या शस्त्रक्रियेच्या परिणामांनी चकित झालो आहे, अशी प्रतिक्रिया सँडनेसने दिली. सर्वसामान्य लोकांप्रमाणे अन्नग्रहण करू शकत असल्याचे त्याने सांगितले. नसांचे शैथिल्यही दूर झाले असून संवेदना विकसित होत असल्याचे त्याने मोठ्या समाधानाने सांगितले. गेल्या १० वर्षांपासून अँड्रयू रुग्णाचे जीवन कंठत होता. शस्त्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी त्याने मनाची तयारी केली. त्याच्या निश्चयामुळे हे सोपे झाल्याचे सर्जिकल डिरेक्टर समीर मर्दिनी यांनी सांगितले.  
 
दात्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक अवयव काढला
व्हर्च्युअल सर्जिकल प्लॅनिंग आणि त्रिमितीय मुद्रण तंत्राचा वापर :  विविध स्पेशलाइज्ड डॉक्टरांच्या चमूने मिळून हे काम केले. व्हर्च्युअल सर्जिकल प्लॅनिंग तंत्राचा आणि थ्री डी प्रिंटिंग (त्रिमितीय मुद्रण तंत्र) चा यासाठी वापर करण्यात आला. चेहऱ्याचे सौंदर्य आणि प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केल्यानंतर होणारे बदल याची क्षमता तपासण्यात आली. रोचेस्टर कँपसमधील मायो क्लिनिकमध्ये यावर संशोधन केले गेले.  
 
चेहऱ्याचे प्रत्यारोपण करताना दात्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक अवयव काढावा लागतो. त्वचा, चरबी, स्नायू, नस, हाडाला स्नायूंच्या जोडणाऱ्या पेशी, ऊती आणि हाडे अशा चेहऱ्याच्या प्रत्यांगांचे हे प्रत्यारोपण असते. रुग्णाच्या रक्तवाहिन्यांचे काम पूर्ववत करण्यासाठी बारकाईने ही सर्जरी करावी लागते, असे मायो क्लिनिकच्या टीमने सांगितले. ते यशस्वी झाले तरच त्याच्या क्षमता पूर्ववत होतात.
 
बातम्या आणखी आहेत...