आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाली जन्मलेल्या बाळांचा जीव वाचवण्यास अमेरिकी शास्त्रज्ञांनी तयार केला प्लॅस्टिक बॅगसारखा कृत्रिम गर्भ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिलाडेल्फिया- अकाली जन्मणाऱ्या बाळांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने अमेरिकी शास्त्रज्ञांनी एक कृत्रिम गर्भ तयार केला आहे. हा गर्भ एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीसारखा आहे. यात गर्भाची अगदी नैसर्गिक गर्भात होते तशीच वाढ होऊ शकणार आहे. अर्भकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व घटक या पिशवीतून मिळू शकतील. सध्या या कृत्रिम गर्भाचा वापर जनवारांच्या भ्रूणांवर प्रयोगासाठी केला जात असून आगामी काळात मानवी गर्भही या प्लॅस्टिकच्या पिशवीत वाढू शकेल.

अनेकदा महिला अर्धवट वाढ झालेल्या अर्भकांना जन्म देतात. सध्या २३ आठवड्यांपूर्वी जन्मणाऱ्या अर्भकांचा मृत्यू होतो. या अर्भकांचा जीव वाचवण्याच्या दृष्टीने ही पिशवी उपयोगी ठरेल. फिलाडेल्फिया बाल रुग्णालयाने हा कृत्रिम गर्भाशय तयार केला अाहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या २३ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या अर्भकांना इनक्युबेटर्समध्ये जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले जाते. यामुळे अर्भकाच्या फुफ्फुसांची वाढ होण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

प्लॅस्टिकच्या या बायो बॅगमध्ये मीठ आणि गरम पाण्याचे मिश्रण भरले जाते. हे मिश्रण आईच्या गर्भातील अॅमनिओटिक फ्लुइडसारखे (गर्भोदक) काम करते. यामुळे भ्रूण वाढू शकतो. हे मिश्रण रोज बदलले जाते. यामुळे भ्रूणास रोज नवीन पुरवठा होतो. गर्भात नाळेतून भ्रूणास ऑक्सिजन आणि पौष्टिक द्रव्य मिळते. ते प्लॅस्टिकच्या गर्भातही मिळावे म्हणून विशेष मशीन लावली गेली आहे. यामुळे पोटातील अर्भकाचे हृदय योग्य कार्यरत होते. 
 
२३व्या आठवड्यात जन्मले तर जगण्याची शक्यता १५%
डॉक्टरांनुसार, सध्या २३व्या आठवड्यापूर्वी जन्मणाऱ्या बाळांची वाचण्याची शक्यता ०% असते. २३ व्या आठवड्यात जन्मणाऱ्या बाळासाठी १५%, २४ व्या आठवड्यात ५५% आणि २५व्या आठवड्यात ८०%असते. संशोधक डॉ. पारर्टिझ म्हणतात, आमचा उद्देश केवळ बाळांचा जीव वाचवणे हा आहे. या बाळांना बहुतांश वेळा श्वास घेण्यात अडचणी येतात.
बातम्या आणखी आहेत...