आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

57 हजार कोटींच्या कंपनीने ओबामांना दिली जॉबची ऑफर, काम गाण्यांची यादी करण्याचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओबामांनी चेष्टेत म्युझिक कंपनी स्पॉटिफायमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती...
वॉशिंग्टन - येत्या २० जानेवारीला अध्यक्ष बराक ओबामा व्हाइट हाऊस सोडणार आहेत. मात्र, त्यांना आतापासूनच नोकरीच्या ऑफर सुरू झाल्या आहेत. त्यांना पहिली ऑफर स्वीडनची म्युझिक कंपनी स्पाॅटिफायने दिली आहे. आपल्या वेबसाइटच्या करिअर पानावर ‘प्रेसिडेंट ऑफ प्लेलिस्टस्’ पदासाठी जागा रिक्त असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यात ओबामा यांचे नाव नाही, शिवाय वेतन किती मिळणार याची माहितीही नाही. मात्र, या पदाच्या पात्रतेच्या अटी ओबामांशी जुळतात. सोबत कंपनीचे सीईओ डॅनियल इक यांनी ट्विटरवर ओबामांना या नोकरीच्या जागेची माहिती पण दिली आहे. डॅनियल यांनी लिहिले आहे की, ‘तुम्ही आमच्या कंपनीत काम करू इच्छिता म्हणून ऐकले. वेबसाइटवर ही लिंक तुम्ही पाहिली आहे का?.’
वास्तविक ५५ वर्षीय ओबामांनी काही दिवसांपूर्वी चेष्टा-मस्करी करताना स्पॉटिफायमध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. याबद्दल स्वीडनमधील अमेरिकेच्या माजी राजदूताची पत्नी नतालिया ब्रेझिन्स्की यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती. यानंतर कंपनीने ही आॅफर दिली आहे.
 
पात्रता अटी अशा, ज्या ओबामाच पूर्ण करू शकतात
- एखादा मोठा देश चालवण्याचा किमान ८ वर्षांचा अनुभव. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला हवा.
- पत्रकार परिषदेत प्लेलिस्टबाबत ठणकावून बोलता आले पाहिजे. 
- उमेदवाराचा स्वभाव मित्रत्वाची भावना जपणारा हवा. सोबत जगातील संगीत क्षेत्रातील लोकांशी त्याचे मैत्रीचे संबंध हवेत. 
- उमेदवाराने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत केंड्रिक लॅमरचा (अमेरिकी रॅपर) कार्यक्रम ठेवलेला असावा. (लॅमर ओबामा यांचे आवडीचे रॅपर आहेत.)
 
संगीत क्षेत्रात स्पॉटिफाय सर्वात मोठी कंपनी
स्पॉटिफाय ही आंतरराष्ट्रीय स्वीडिश कंपनी असून जगभरात ही कंपनी गाण्यांचे स्ट्रीमिंग करते. सन २००६ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी २० देशांत ५० हून अधिक भाषांमध्ये काम करत असून तिचे प्रत्येक महिन्याला १० कोटींहून अधिक अॅक्टिव्ह युजर आहेत. सध्या या कंपनीचे भांडवली मूल्य ५७ हजार कोटींचे आहे. म्हणजे अमेरिकेतील एकूण रेकॉर्डेड म्युझिक इंडस्ट्रीच्या भांडवलाहून अधिक.