बीजिंग - सीमेवरील वाढत्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी चीनने व्याप्त काश्मीर व अफगाणिस्तानच्या बाजूच्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवली आहे. त्यामुळे घुसखोरीलाही रोखता येऊ शकेल, असे चिनी अधिकाऱ्यांना वाटते.
शिनजियांग प्रांतात अलीकडेच मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडून आला होता. पूर्व तुर्कस्थान इस्लामिक मुव्हमेंट या बंडखोर गटाने चीनच्या सुरक्षा दलाच्या नाकीनऊ आणले आहेत. चीनसाठी हा बंडखोर गट दहशतवाद वाढवणारी डोकेदुखी ठरला आहे. या गटाला पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून पाठबळ मिळू नये, यासाठी दोन्ही देशांच्या सीमेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत सीमेवरील हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
म्होरक्याच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणात घुसखोरी
बंडखोर गटाचा म्होरक्या अनिवर तुर्सन हा तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेसाठी अनेक वेळा कट रचण्यात आले. त्यासाठी घुसखोरी करण्यात आल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणेने सरकारकडे व्यवस्था आणखी कडक करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने त्या दिशेने निर्णय घेतला आहे.
शिनजियांग संवेदनशील
चीनचा शिनजियांग हा सीमेवरील अतिशय संवेदनशील प्रांतात मानला जातो. परंतु पाकिस्तानसोबत असलेल्या मैत्रीमुळे चीनने त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नव्हते. वाढता हिंसाचार, गुन्हेगारी, घुसखोरीमुळे सरकारने त्याकडे आता गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. आता या भागातून पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानातून चीनमध्ये चिटपाखरूदेखील परवानगीशिवाय येणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे.
आर्थिक प्रकल्प याच भागात
चीन-पाकिस्तान आर्थिक प्रकल्प शिनजियांग प्रांतात येतो. त्याच्या उभारणीचे काम अजूनही सुरू आहे. भारताने आर्थिक प्रकल्पामुळे दहशतवादाला खतपाणी मिळणार असल्याकडे लक्ष वेधले होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या चीनला आता धडा मिळाला आहे. त्यामुळेच सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चिनी माध्यमांनी सुरक्षा वाढवण्यात आलेल्या प्रदेशाचा उल्लेख केला आहे.