आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन: वरिष्ठ सभागृहात थेरेसा यांची कोंडी; मुदत टळण्याची भीती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी संसदेला सामोरे जाताना पंतप्रधान थेरेसा मे. - Divya Marathi
बुधवारी संसदेला सामोरे जाताना पंतप्रधान थेरेसा मे.
लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासमोरील ब्रेक्झिटचा पेच वाढण्याची चिन्हे आहेत. कारण युरोपीय संघातील देशांसोबत झालेल्या चर्चेवर विशेषाधिकार वापरण्याची परवानगी ब्रिटिश संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने लोकप्रतिनिधींना दिली आहे. वास्तविक मार्च अखेरपर्यंत इंग्लंडने युरोपीय संघातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू करणे अावश्यक आहे. ती टळल्यास कराराचा भंग होऊन संपूर्ण ब्रेक्झिट प्रक्रिया बारगळू शकते. त्यामुळे थेरेसा यांच्यावरील दबाव वाढला आहे.  

ब्रिटिश संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये बुधवारी यासंबंधीच्या प्रस्तावावर ३६६ विरुद्ध २६८ मते पडली. थेरेसा मे युरोपीय देशांसोबत ब्रेक्झिटबाबत चर्चा केल्यानंतर त्याच्या निष्कर्षावर आक्षेप घेणे किंवा रद्द ठरवण्यासाठी लोकप्रतिनिधींना विशेषाधिकार वापरता येऊ शकतील. ब्रिटन संघातून बाहेर पडू इच्छिते, अशी दुरुस्ती सुचवणाऱ्या विधेयकाला मंगळवारी संसदेत मंजुरी देण्यात आली होती. १ मार्च रोजी देखील मे यांना या मुद्द्यावर पराभव आणि विरोधाचा सामना करावा लागला होता. इयूमधून बाहेर पडल्यानंतर सदस्य राष्ट्रांतील नागरिकांना त्यांच्या हक्काची हमी देणाऱ्या विधेयकाला वरिष्ठ सभागृहात मंजुरी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर मे यांना संसेदत मिळालेला हा दुसरा धक्का मानला जात आहे. त्यामुळे मे यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जाणार आहे. कारण युरोपीय संघाच्या लिस्बन करारातील कलम ५० अंतर्गत ब्रेक्झिटमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया मार्च २०१७ अखेरीस सुरू होणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया दोन वर्षे चालणार आहे.  
 
ब्रेक्झिट मतदानासाठी थेरेसा यांची सहमती  
ब्रेक्झिट डीलबाबत संसदेचा कौल जाणून घेण्याची तयारी अगोदरच थेरेसा मे यांनी दर्शवली होती. त्यानुसार युरोपीय संघासोबतच्या कराराला लोकप्रतिनिधींनी नाकारल्यास ब्रिटन विनाअडथळा सदस्य राष्ट्रांसोबत व्यापार संबंध सुरू ठेवू शकेल. त्यासाठी कोणत्याही कराराची गरज भासणार नाही. ‘टेक इट ऑर लिव्ह इट’ धर्तीवर मे यांनी आपली तयारी दर्शवली होती.  
 
‘अर्थसंकल्पात काहीही धक्कादायक नसेल’  
ब्रेक्झिटची मुदत संपत आली आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात जनतेला कोणताही धक्का द्यायचा नाही, याची खबरदारी अर्थमंत्री फिलीप हेमण्ड यांनी घेतलेली दिसते. म्हणूनच यंदा करासंबंधी कसलीही घोषणा नसल्याचे संकेत हेमण्ड यांनी दिले आहेत. ब्रेक्झिटच्या सार्वमतानंतरही ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल चांगली सुरू आहे. आम्ही सध्या युरोपीय संघासोबत वाटाघाटी करत आहोत. ती प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर विकास दर राखण्याची बांधिलकी देखील पूर्ण केली जाईल, असे आश्वासन यांनी स्पष्ट केले. 
 
वरिष्ठ सभागृहात बहुमत नाही  
थेरेसा मे यांच्या काँझर्व्हेटिव्ह पार्टीकडे हाऊस ऑफ कॉमनमध्ये बहुमत आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये बहुमत नसल्याने विरोधकांनी मे यांच्या प्रस्तावाला हाणून पाडले आहे. म्हणूनच प्रस्तावावर तीन तास चर्चा झाल्यानंतरही मोठ्या फरकाने पराभव झाला. १८३१ नंतर पहिल्यांदाच सरकारच्या एखाद्या प्रस्तावाला संसदेच्या वरिष्ठ सभागृहात मोठ्या फरकाने फेटाळण्यात आले आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...