आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘संस्कारी’ बुरुंडी बनवण्यासाठी राष्ट्राध्यक्षांचा आदेश : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्यांनी लग्न करावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुजुंबरा  - बुरुंडीत लग्न न करताच सोबत राहणाऱ्या जोडप्यांनी हे वर्ष संपण्याच्या आत लग्न करावे, असे फर्मान काढण्यात आले आहे. तसे न केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. अशा जोडप्यांनी पुढील वर्षात जन्म दिलेल्या मुलांना सरकारी सुविधाही मिळणार नाहीत.  
 
बुरुंडी सरकार आपल्या या निर्णयाच्या समर्थनार्थ काही तर्क देत आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या निर्णयानंतर लोकसंख्येत वेगाने होणाऱ्या वाढीला लगाम घातला जाऊ शकेल. त्याशिवाय गुन्ह्यांनाही आळा बसू शकेल. राष्ट्राध्यक्ष कुरूनजिजा पीएर यांनी देशाला ‘संस्कारी’ बनवण्याचा विडा उचलला असून हा निर्णय त्याचाच एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी देशात नैतिक मूल्यांच्या प्रचारासाठी अलीकडेच राष्ट्रीय नैतिकता मोहीम सुरू केली आहे.
 
कुरूनजिजा म्हणाले की, लग्न न करताच राहणाऱ्या जोडप्यांनी लग्न करून परस्परांत आणि देशाप्रती प्रेम असल्याचे दाखवायला हवे. तसे झाल्यास ते सामाजिक व्यवस्था मजबूत करतील, त्याचा थेट परिणाम कायदा-व्यवस्थेवर पडतो. चर्च आणि लग्न लावून देणाऱ्या इतर संस्थांची भूमिकाही सकारात्मक आहे. त्या युवकांचे लग्न लावून देऊन देशभक्तीची जबाबदारी पार पाडत आहेत. या वर्षी लग्न न करणाऱ्या जोडप्यांवर काय कारवाई होणार हे अद्याप स्पष्ट नाही, पण पियरे या शेतकऱ्याने सांगितले की, ‘मला एका मुलीशी लग्न करण्याची इच्छा होती, पण मुलीचे कुटुंबीय मोठी रक्कम मागत होते. माझ्याकडे पैसे नव्हते. आता मी लग्न न करताच त्या मुलीसोबत राहत आहे, असे मी एका अधिकाऱ्याला सांगितले. त्यावर तो अधिकारी म्हणाला की, तसे असेल तर त्याला दंड ठोठावला जाऊ शकतो. त्याशिवाय लग्नाआधी झालेल्या त्याच्या मुलांना मोफत शिक्षण आणि औषधी अशा सुविधा मिळणार नाहीत.’ गृह मंत्रालयाचे प्रवक्ता टेरेन्स ताथिराजा म्हणाले की, नैतिकता मोहिमेचा उद्देश बहुविवाहासारखी प्रथा रोखणे हा आहे. कायदेशीररीत्या लग्न केल्यास वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्या वाढीला आळा बसू शकेल. सध्या युवक आधुनिकता आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली लग्नाआधीच सोबत राहत आहेत. त्यामुळे अनेक शालेय विद्यार्थिनी गर्भवती होत आहेत. समस्या एवढ्यापुरतीच नाही. या मुलींचे जोडीदार त्या गर्भवती झाल्या की त्यांना सोडून जातात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.  
 
राष्ट्राध्यक्षांनी स्वत: सुरू केली नैतिकतेची मोहीम
कुरुनजिजा यांनी २०१५ मध्ये जेव्हा तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्या विरोधात निदर्शने झाली होती. त्यात लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता. कुरुनजिजा त्यानंतरच युवकांत नैतिकता वाढवण्यावर भर देत आहेत.
 
 
बातम्या आणखी आहेत...