आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकच्या सैन्य कारवाईमुळे मोसूल भागात आनंदोत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्बिल - इराकी लष्कर व अमेरिकेच्या संयुक्त कारवाईमुळे काराकश शहरातील विस्थापित ख्रिश्चन समुदायाने अक्षरश: नृत्य-गाणी करत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, आघाडी राष्ट्रांच्या सैन्याने मोसूलच्या दिशेने कूच केली आहे. लष्कराची चढाई सुरू आहे.

विस्थापित अल्पसंख्याक समुदायातील काही लोक सध्या अर्बिल शहरात राहू लागले आहेत. त्यांना आपले मूळ शहर काराकश सोडावे लागले आहे. हे शहर इसिसच्या ताब्यात आहे. दोन दिवसांपूर्वी इराकी सैन्याने इसिसच्या विरोधात महामोहिमेला सुरुवात केली आहे. लष्कराने मंगळवारी काराकश शहराच्या दिशेने बरीच मजल मारली आहे. हे शहर मोसूलपासून आग्नेयला १५ किलोमीटर अंतरावर आहे. २०१४ मध्ये शहर दहशतवादी संघटनेने ताब्यात घेतले होते. त्यामुळे नागरिकांना ते सोडावे लागले होते. परंतु आता कारवाईमुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. लवकरच पुन्हा शहरात परतता येईल, असे वाटते. या निमित्ताने ख्रिश्चन पुरुष-महिलांसह मुलांनीही नृत्य केले. काराकशची लोकसंख्या सुमारे ५० हजार आहे. हे शहर ख्रिश्चनबहुल आहे.

पुतीन यांची तुर्की, इराकी नेत्यांशी चर्चा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी तुर्की, इराकच्या नेत्यांशी मोसूलमधील सैन्य कारवाईबद्दल फोनवरून चर्चा केली. इराकी सैन्याला त्यांच्या लष्करी मोहिमेत यश मिळावे, अशा शुभेच्छा पुतीन यांनी पंतप्रधान हैदर अल-अबादी यांना दिल्या. पुतीन व तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसिप ताईप एर्डोगन यांच्यातही चर्चा झाली.

इसिसला पैशांच्या नव्या स्रोतांचा शोध
वॉशिंग्टन । इसिसच्या ताब्यातील अनेक भूभाग परत मिळवण्याच्या मोहिमा तेजीत आहेत. त्यात यश आल्याने दहशतवाद्यांना अनेक ठिकाणाहून पळ काढावा लागला आहे. सत्तेखालील भूप्रदेश कमी होत असल्याने त्यामुळे पैशांचा तुटवडा जाणवू लागला आहे. म्हणूनच इसिसला पैशांच्या नव्या स्रोतांचा शोध आहे, असे अमेरिकी जाणकारांचे म्हणणे आहे.

मोसूलमधून बाहेर काढू : राष्ट्राध्यक्ष आेबामा
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मोसूलमधील सैन्य कारवाईत इसिस संघटनेचा पाडाव होईल. दहशतवाद्यांना निश्चितपणे मोसूलमधून बाहेर काढले जाईल, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी व्यक्त केला आहे. इराकी सैन्याच्या सहकार्याने ही मोहीम सुरू आहे. सैन्य कारवाईचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल, याबद्दल मला खात्री आहे, असे आेबामा यांनी सांगितले. मोसूलची लढाई कठीण आहे. परंतु सैन्याने यशस्वी मजल मारत चढाई केली आहे. त्यामुळे इसिसचा पराभव निश्चित आहे, असे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...