आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आेबामांनी खराब डील कशी केली? ऑस्ट्रेलियन PM वर ट्रम्प भडकले, फोनही आदळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परराष्ट्र मंत्रीपदाच्या घोषणेनंतर बोलताना रॅक्स टिलर्सन  . - Divya Marathi
परराष्ट्र मंत्रीपदाच्या घोषणेनंतर बोलताना रॅक्स टिलर्सन .
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अद्वातद्वा बोलण्याचा किस्सा समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्याशी निर्वासितांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी फोन आपटला. चर्चेसाठी एक तासाची वेळ दिलेली असताना भडकलेल्या ट्रम्प यांनी २५ मिनिटांतच ती आटोपली. ऑस्ट्रेलिया हा अमेरिकेचा चांगले मित्र  राष्ट्र असतानाही, आेबामांनी एवढी खराब डील कशी केली ? आता मला बघावे लागेल, अशा शब्दांत संताप व्यक्त करून फोन ठेवून दिला.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांच्या कार्यकाळात ऑस्ट्रेलिया-अमेरिका यांच्यातील संबंध अत्यंत मैत्रीपूर्ण राहिले. त्यांच्यातील विविध क्षेत्रंातील भागीदारीही चांगली होती. परंतु सत्तेची सूत्रे हाती घेऊन एक महिनाही पूर्ण होत नाही. तोच ट्रम्प यांनी आेबामांच्या निर्वासितासंबंधीच्या कराराची ऐशीतैशी करून टाकण्याचे संकेत दिले आहेत. या प्रश्नी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल यांच्याशी तासभर बोलून समस्या सोडवण्याचे ठरले होते. ही योजना आेबामांच्या कार्यकाळात करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप झालेली नव्हती. त्यामुळे चर्चेदरम्यान टर्नबुल यांनी त्यांना विचारणा केली. त्यावर ट्रम्प भडकले. आेबामा यांनी १२५० जणांना अमेरिकेत आश्रय देण्याची ग्वाही दिली होती. हे निर्वासित मूळचे इराण ,अफगाणिस्तान, इराकचे नागरिक आहेत. ऑस्ट्रेलियाने या नागरिकांना सामावून घेण्यास नकार दिला होता. त्यावर ट्रम्प यांनी आेबामा यांच्या निर्णयावर राग व्यक्त केला. आेबामांनी एवढी खराब डील केलीच कशी ? मला त्याची अधिक माहिती नाही, असे ते म्हणाले. 

विविध वक्तव्यांमुळे संभ्रम
हा करार स्वीकारल्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले आहे, असे फोनवरील संभाषणानंतर टर्नबुल सांगितले होते. त्याचबरोबर त्यांनी ट्रम्प यांचे आभारही व्यक्त केले होते. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते स्पाइसर म्हणाले, ट्रम्प यांना करार राहू द्यायचा आहे. परंतु नंतर ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करून भलतेच विधान करून टाकले. तुम्हाला विश्वास बसेल का ? आेबामा प्रशासनाने ऑस्ट्रेलियातील हजारो निर्वासितांना अमेरिकेत आश्रय देण्याची तयारी दर्शवली होती. ही बकवास डील आहे. मी त्याचा बारकाईने अभ्यास करीेन, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

पुतीनचे निकटवर्तीय टिलर्सन परराष्ट्र मंत्री
अक्सॉन मोबिल या प्रमुख तेल उत्पादक कंपनीचे सीईआे रॅक्स टिलर्सन (६४) हे आता अमेरिकेचे नवीन परराष्ट्र मंत्री झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. त्यांना सिनेटमध्ये विरोध झाला होता. त्यावरून डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन यांच्यात वादंग झाले होते. शेवटी सिनेटने त्यांच्या बाजूने ५६ विरुध ४३ कौल दिला होता. गुरुवारी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी शपथ घेतली होती. रॅक्स यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत. सुमारे १ हजाराहून अधिक मुत्सद्दी व परराष्ट्र विभागातील अधिकारी ट्रम्प यांच्या विरोधात आहेत. सात मुस्लिम राष्ट्रांच्या विरोधातील निर्णयावर देशात नाराजी आहे. गत सरकारमध्ये जॉन केरी यांना ९४-३ व हिलरी क्लिंटन यांना ९४-२ असा कौल मिळाला होता.

ट्रम्प यांना झटका, येमेनच्या २८ जणांना परवानगी द्या , न्यायालयाचे आदेश 
परदेशी लोकांना प्रवेश बंदीच्या प्रकरणात ट्रम्प यांना आणखी एक झटका मिळाला आहे. कॅलिफोर्नियाच्या फेडरल जज आंद्र बायरोट यांनी येमेनच्या २८ जणांना अमेरिकेत प्रवेश द्यावा, असे अादेश दिले आहेत. त्यांना आफ्रिकेतील जिबुतीमध्ये रोखण्यात आले आहे. जिबुतीमध्ये १ हजाराहून अधिक लोक अडकले आहेत. त्यापैकी एकाची पत्नी अमेरिकेची नागरिक आहे.
बातम्या आणखी आहेत...