आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांची टिप्पणी: रशियाशी चांगले संबंध ठेवणे गरजेचे, विरोध करणारे मूर्ख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, रशियाशी उत्तम संबंध ठेवणे ही चांगली बाब आहे. फक्त ‘मूर्ख लोक’च याला चुकीचा विचार म्हणू शकतात. ट्रम्प यांनी याबाबत अनेक ट्विट केले. त्यांनी म्हटले आहे की, आमच्यासमोर अनेक समस्या आहेत. आणखी एक समस्या वाढावी असे मला वाटत नाही. मी अध्यक्ष झाल्यानंतर रशिया अमेरिकेला जास्त सन्मान देईल आणि दोन्ही देश एकत्र येऊन जगातील मोठ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील.  

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियावर सायबर हॅकिंगचे आरोप झाले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचे हे ट्विट्स महत्त्वाचे मानले जात आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांना व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी सायबर हॅकिंगद्वारे मदत केली, असा आरोप डेमॉक्रॅटिक पार्टीने केला होता. त्यावर ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘डेमोक्रॅट्स आपले सर्व्हर हॅकिंगपासून वाचवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड बेपर्वाईचा आरोप करायला हवा. निवडणुकीच्या निकालात छेडछाड झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. मतदान यंत्रांना तर हातही लावण्यात आला नाही.’  
 
पुरावे कुठे आहेत? : रशियन माध्यमांचा प्रश्न  
क्रेमलिन किंवा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आतापर्यंत अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाच्या हॅकिंगबद्दल कुठलाही टिप्पणी केली नाही. पण हॅकिंग रशियाने केले किंवा अध्यक्ष पुतीन यांनी करून घेतले याचे पुरावे कुठे आहेत, असा प्रश्न रशियाच्या माध्यमांनी रविवारी विचारला. रशियात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या चॅनल वनने म्हटले आहे की, हे आरोप टीव्हीच्या कार्यक्रमांवर आधारित आहेत. ते सोशल मीडियावर आधारित आहे, तिथे बहुतांश सामग्री मनोरंजनासाठी असते. रशियाचे सरकारी टीव्ही चॅनल रोसिया वनचे वॉशिंग्टन बातमीदार अलेक्झांडर ख्रिस्तेंको यांनी म्हटले आहे की, हा अहवाल म्हणजे अमेरिकेच्या भावी अध्यक्षांची वैधता आणि प्रतिमा बिघडवण्याचा एक प्रयत्न आहे.
 
गुप्तचर विभागाने ट्रम्प यांना एक अहवाल सोपवला आहे. त्यात रशियाच्या हॅकिंगचे काही पुरावेही होते, असे म्हटले जात आहे. अहवालातील काही प्रमुख मुद्दे असे :
-   डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीचे ई-मेल आणि पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे ई-मेल हॅक करण्यात आले आहेत.  
-   हॅकिंगद्वारे मिळालेली माहिती इतरांना देण्यासाठी विकिलीक्स, डीसी लिक्स डॉट कॉम आणि गुसीफर २.० नावाच्या हॅकरचा वापर करण्यात आला होता.  
-    त्यात राज्य समर्थित प्रपोगंडा वापरण्यात आला होता. तसेच सोशल मीडियावर वाईट कॉमेंट्स करणाऱ्यांसाठी ट्विटर युजर आणि ‘ट्रोल’ करणाऱ्यांना रक्कम देण्यात आली होती.  
-   अध्यक्षपद निवडणुकीत रशिया ट्रम्प यांना स्पष्टपणे प्राधान्य देत होता.  
 
 
 
बातम्या आणखी आहेत...