आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प यांची संसदेमधील पहिली अग्निपरीक्षा आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अग्निपरीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. त्यांनी तयार केलेल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांना सिनेटच्या तिखट प्रश्नांना सामोरे जावे लागेल. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीस मंजुरी किंवा नकार दिला जाईल. अर्थात बहुतांश नावांना मंजुरी मिळेल अशीच शक्यता आहे. कारण या वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत आहे.

अमेरिकेत प्रथमच मंत्रिमंडळात श्रीमंत उद्योगपतींची संख्या जास्त आहे. ट्रम्प प्रशासन २० जानेवारीला सत्तासूत्रे हाती घेईल. ते तीन महिन्यांत पहिल्यांदाच बुधवारी न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करतील. ते आपल्या कारभाराच्या भविष्याबाबत माहिती देतील, अशी शक्यता आहे.

दरम्यान, ट्रम्प यांचे चीफ ऑफ स्टाफ रिन्स प्रीबन्स सोमवारी म्हणाले की, अध्यक्षपद निवडणुकीतील हॅकिंगसाठी रशिया जबाबदार आहे, हे ट्रम्प यांनी मान्य केले आहे. या हॅकिंगचा निशाणा डेमॉक्रॅट नॅशनल कमिटी आणि हिलरी क्लिंटन यांच्या एक जवळच्या सहकाऱ्याककेडच होता. सुरुवातीला मंगळवारी अलाबामाच्या जेफ सेशन्स यांच्या नियुक्तीला दुजोरा मिळेल. ट्रम्प यांनी त्यांना अॅटर्नी जनरल केले आहे. त्यानंतर जनरल जॉन केली यांना प्रश्न विचारले जातील. केली अंतर्गत संरक्षणमंत्री असतील.
 
किती श्रीमंत हे सांगितलेच नाही : डेमॉक्रॅट्सची तक्रार
आपल्याला काही नियुक्त मंत्र्यांचे आर्थिक घोषणापत्र मिळालेच नाही, अशी तक्रार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या काही सिनेटरनी केली आहे. ते अत्यंत श्रीमंत व्यावसायिक आहेत. त्यांच्याबद्दलची सुनावणी याच आठवड्यात होणार आहे. अनेक लोक तर असे आहेत की आपण किती श्रीमंत आहोत, याची माहितीही त्यांनी जाहीर केली नाही.
 
मंत्रिमंडळात सदस्यांचा ७० तास सराव
ट्रम्प यांच्या ट्रान्झिशन टीमने रविवारी सांगितले की, ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी सिनेटमधील चौकशीसाठी तब्बल ७० तासांचा सराव केला आहे. त्यासाठी काही स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अत्यंत कठोर प्रश्न विचारले.
 
चीनची धमकी, वन चायना धोरण बंद केल्यास बदला घेऊ
तैवानच्या अध्यक्षा साई इंग-वेन यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यामुळे चीन संतप्त झाला आहे. अमेरिकेने वन चायना धोरण बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बदला घेऊ, अशी धमकीच चीनने दिली आहे. चीन तैवानला आपला भाग समजतो. तैवानच्या अध्यक्षा इंग-वेन लॅटिन अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाल्या आहेत. त्या रविवारी ह्यूस्टनमध्ये होत्या. त्यांनी अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांची भेट घेतली.
 
पुन्हा निवडणूक लढवण्यास हिलरी क्लिंटन यांचा नकार
माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी भविष्यात निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली आहे. डेमॉक्रॅटिक पक्षाशी संबंधित सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या थिंक टँकच्या अध्यक्षा नीरा टंडन यांनी हा दावा केला आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जास्त मते मिळाली तरी हिलरींना पराभव पत्करावा लागला. निकाल लागल्यानंतर त्या फक्त दोन वेळा सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या. हिलरी आणि त्यांचे पती बिल क्लिंटन हे २० जानेवारीला ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होणार आहेत.