आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियात दहशतवादी समजून मंत्र्यावर गोळीबार, राष्ट्रपती विदेश दौरा अर्धवट सोडून परतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मोगादिशू - सुरक्षा दलाच्या जवानांनी तेथील सार्वजनिक कार्य मंत्र्यालाच दहशतवादी समजून गोळ्या घातल्याची घटना सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये घडली आहे. यात ३१ वर्षीय मंत्री अब्दुल्लाही शेख अब्बास यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सोमालियाच्या राष्ट्रपती भवनाजवळच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्या वेळी अब्बास सरकारी वाहनातूनच जात होते. 

नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अब्बास यांनी माहिती मंत्री अब्दी हसन यांचा दणदणीत पराभव केला होता. सोमालियातील ते सर्वात युवा मंत्री होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रपती मोहम्मद फारमाजो यांनी इथियोपियाचा त्यांचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी प्रस्थान केले. शिवाय, या घटनेच्या चौकशीचेही आदेश जारी केले आहेत. पोलिस मेजर नूर हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीवर असलेल्या जवानांनी रस्त्यावर ही कार अडवली. दहशतवादी कारवायांमध्ये या कारचा वापर झाल्याचा संशय असल्यामुळे जवानांनी त्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. दरम्यान, त्यात मंत्री अब्बास प्रवास करत असल्याचे त्यांना ज्ञात नव्हते. यात अब्बास यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी अनेक लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती सोमालियाचे माहिती मंत्री अब्दिर रहमान ओसमान यांनी दिली. मात्र, अटकेतील लोकांचा नेमका आकडा त्यांनी स्पष्ट केला नाही.  
 
निर्वासितांच्या शिबिरातून उदयास आलेले नेतृत्व  
अब्दुल्लाही अब्बास हे केनियाच्या दादाब या निर्वासितांच्या शिबिरामध्ये लहानाचे मोठे झाले. सोमालियाच्या गृहयुद्धावेळी देश सोडून पळालेले बहुतांश निर्वासित याच शिबिरात राहत होते. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. सोमालियाचा बहुतांश भाग अल कायदाशी संबंधित अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात आहे. मागच्या वर्षी जूनमध्ये अल शबाबच्या दहशतवाद्यांनी एका ताफ्यावर हल्ला चढवला होता. त्यात सोमालियाचे पर्यावरण मंत्री बुरी मोहम्मद हमजा यांच्यासह १५ जण ठार झाले होते.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...