डुंडी (स्कॉटलड) - अन्नाची नासाडी थांबवण्यासाठी स्कॉटलँडच्या एका भारतीय हॉटेलने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या हॉटेलमध्ये एखाद्याने भोजनानंतर ताटात अन्न ठेवल्यास एका ताटामागे सुमारे १६६ रुपयांचा दंड द्यावा लागेल. लोक हॉटेलमध्ये आल्यावर त्यांना मेन्ू कार्डसोबत एक मेजरिंग कार्ड दिले जाते. या चौकोनी कार्डचा आकार चार इंच असतो. ग्राहकाचे जेवण झाल्यानंतर हे कार्ड त्यांच्या ताटाच्या मधोमध ठेवले जाते.
जर कार्डाच्या बाहेर अन्न गेल्यास ग्राहकाला दंड ठोठावला जातो. या कार्डावर एक संदेशही लिहिण्यात आलेला आहे. “ताटात उरलेल्या अन्नाने कार्डाची रिकामी जागा भरून निघाल्यास एका ताटामागे १६६ रुपये दंड द्यावा लागेल. अन्नाचा पिरॅमिडही बनवता येणार नाही. म्हणजेच अन्न ताटात पसरट असावे.’ ताजा इंडियन बफे नामक या हॉटेलने दीड महिन्यापूर्वी हा नियम लागू केला असून आतापर्यंत तीन ग्राहकांना दंड ठोठावला आहे. हॉटेल व्यवस्थापक वसीम सलीमी यांच्या मते, आमच्याकडे फक्त बफे सुविधा असून सुमारे १२५० रुपयांत एक व्यक्ती भरपेट जेवू शकतो. मात्र, अनेक जण ताटात अन्न उष्टे ठेवून जातात. त्यामुळे आठवड्यात सुमारे ५ क्विंटल अन्नाची नासाडी होते.
आम्ही सुरुवातीला लोकांना अन्न नासाडी टाळण्यासाठी खूप समजावून सांिगतले. परंतु, लोकांच्या सवयीत काही बदल झाला नाही. अन्नाची अशी नासाडी पाहून मी आणि आमचे कर्मचारी त्रासून गेलो होतो. काय करावे हे सूचत नव्हते. परंतु काहीतरी करण्याची ऊर्मी होती. त्यानंतर आम्हाला ही दंडाची कल्पना सुुचली. आम्ही नफा कमावण्यासाठी हे पाऊल उचलले नाही. उलट कुणाकडून दंड घ्यायची वेळच येऊ नये, असे आम्हाला वाटते. बफेसाठी पैसे मोजतोय म्हणून काही करायला मोकळे, अशी बहुतेक लोकांची मानसिकता असते. त्यामुळे ते ताटात भरपूर अन्न घेतात आणि फक्त चव घेऊनच टाकून देतात. आम्हाला त्यांची हीच मानसिकता बदलायची आहे. अावडत असेल तर कोणताही पदार्थ मनसोक्त खा. परंतु, त्याची नासाडी करू नका, इतकेच आम्हाला ग्राहकांना पटवूनद्यायचे आहे. अन्न नासाडी हा फक्त आमच्यासाठीच नव्हे, तर जगासाठी चिंतेचा मुद्दा असल्याचेही ते सांगतात.
सुरुवातीला अनेकांचा विरोध, नंतर पाठिंबा
सलिमी यांच्या मते, हॉटेलमध्ये येणारे बहुतांश लोक या निर्णयामुळे आनंदी आहेत. अनेकांना रागही येतो आणि ते भांडणही करतात. परंतु, विरोधकांची संख्या कमी आहे. अशा लोकांना आम्ही पटवून देतो की मागच्या दोन वर्षांत किती प्रमाणात अन्नाची नासाडी झाली. त्यांना आम्ही सर्व बाजूंनी हा मुद्दा पटवून देतो. त्यामुळे विरोधकांचा विरोध मावळून मग ते या नियमांची स्तुती करू लागतात. शिवाय, हॉटेलमध्येच नव्हे, तर घरीसुद्धा अन्न नासाडी करणार नाही, अशी शपथही घेतात.