आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

iPhone-X चा पुरवठ्यासाठी फॉक्सकॉनने 3000 विद्यार्थ्यांकडून बळजबरीने करून घेतले काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अॅपलच्या नव्या आयफोन-X चा पुरवठा करण्यासाठी असेम्बलिंग कंपनी फॉक्सकॉनने विद्यार्थ्यांकडून काम करून घेतले. बिझनेस वृत्तपत्र फायनान्शियल टाइम्सच्या वृत्तात हा खुलासा करण्यात आला. ३,००० विद्यार्थ्यांना सप्टेंबरमध्ये फॉक्सकॉनच्या झेंगझाऊ प्रकल्पात पाठवण्यात आले होते, असे ६ विद्यार्थ्यांनी सांगितले. तेथे त्यांच्याकडून दररोज अकरा तास काम करून घेतले जात होते. हे विद्यार्थी आयफोन-X ची बांधणी (असेंब्लिंग) करत होते. झेंगझाऊ चीनमधील हेनान प्रांतातील मुख्य शहर आहे. या शहराला चीनचे ‘हार्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग’ असेही म्हटले जाते. फॉक्सकॉन तैवानची कंपनी अाहे.  मुलांच्या ‘इंटर्नशिप’ची माहिती मिळाली असल्याचे अॅपल आणि फॉक्सकॉन दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे. मुले येथे स्वेच्छेने आली होती तसेच कामाच्या बदल्यात त्यांना पैसे  देण्यात आले असल्याचे कंपन्यांनी म्हटले आहे.


दररोज १,२०० आयफोन कॅमेऱ्याची निर्मिती
१७ ते १९ वर्षांच्या या मुलांनी सांगितले की, त्यांना तीन महिन्यांसाठी फॉक्सकॉनच्या प्रकल्पात बळजबरीने पाठवण्यात आले होते. पदवी घेण्यासाठी कामाचा अनुभव आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले असले तरी त्यांच्या अभ्यासक्रमात याचा समावेश नाही. एका विद्यार्थिनीने सांगितले की, तिच्याकडून दररोज १,२०० आयफोन कॅमेऱ्याची बांधणी करून घेतली जात होती. दरवर्षी इंटर्नशिपच्या नावाने मुलांकडून काम करून घेतले जाते.


कामाच्या दबावात फॉक्सकॉनमधील १४ कर्मचाऱ्यांची आत्महत्या 
चीनमध्ये फॉक्सकॉनचे अनेक प्रकल्प आहेत. या कंपनीवर जास्त काम करवून घेत असल्याचा नेहमीच आरोप लागतो. काही कर्मचाऱ्यांनी तर दररोज १८ तास काम केल्याचा आरोप केला होता. या कंपनीतील १४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे आतापर्यंत समोर आली आहेत. इतर चार कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कंपनी परिसरातच कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. 


आयकियाचे कपाट उलटल्याने आठव्या मुलाचा मृत्यू, कंपनीने १.७३ कोटी कपाटे परत मागवली
जगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी आयकियाचे कपाट उलटल्याने दोनवर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मे महिन्यात कॅलिफोर्नियामध्ये झाली आहे. अमेरिकेतील ग्राहक सुरक्षा आयोगाच्या चौकशीत हे प्रकरण समोर आले आहे. अशा प्रकारे कंपनीच्या कपाटाशी संबंधित आठ मुलांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्व मुले तीन वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्याचे आयोगाने म्हटले आहे. पहिल्या मुलाचा मृत्यू २८ वर्षांपूर्वी झाला होता, मात्र उर्वरित सात मुलांचा मृत्यू जानेवारी २००२ नंतर झाला आहे. ज्या कपाटामुळे अपघात झाला त्याला ‘माम ड्रेसर’ म्हणतात. हे कपाट उलटण्याच्या आतापर्यंत १८६ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच ही सर्व कपाटे परत मागवण्यात आली असल्याचा कंपनीचा दावा आहे.


२००२ ते २०१६ दरम्यान झाली या कपाटांची विक्री  
आयकियाने अमेरिका व कॅनडामधील १ कोटी ७३ लाख ‘माम ड्रेसर’ कपाटांना दुरुस्त केले किंवा परत मागवले आहे. यांची किंमत ४,५०० रुपयांपासून ते १३,००० रुपयांपर्यंत होती. या सर्व कपाटांची विक्री २००२ ते २०१६ दरम्यान ऑनलाइन करण्यात आली होती. आता अशा फर्निचरमध्ये सुधारणा करण्यात आली असल्याचा दावा आयकियाने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...