आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काश्मीर’ भारत-पाकचा मुद्दा; हस्तक्षेप करणार नाही : चीन, मोदींचा होता आक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग  - चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरमध्ये गुंतवणुकीमुळे काश्मीर मुद्यावर चीन मध्यस्थी करू इच्छितो या  शक्यतेला चीनने स्पष्टपणे फेटाळले आहे. चीनचे तसे कोणतेही धोरण नाही. ५० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक कॉरिडॉरमुळे काश्मीरविषयी चीनच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. या मुद्यावर तोडगा केवळ भारत-पाक चर्चेतूनच निघू शकेल.  चीनमधील अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या लेखात लिहिले होते की, काश्मीर मुद्द्यावरील तोडग्यासाठी भारत -पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यात बीजिंगचा  स्वार्थ आहे. कारण पाकव्याप्त काश्मीरमधून आर्थिक कॉरिडॉरचा मार्ग जातो. यावर चीनने मोठी गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. दरम्यान चीनचे परराष्ट्र प्रवक्ता गेंग शुआंग यांनी म्हटले आहे की , काश्मीर मुद्यावर चीनची भूमिका पूर्वीचीच आणि ठाम आहे. हा मुद्द्याचे मूळ भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासात आहे. दोन्ही देशांनी चर्चेनेच हा वाद मिटवावा. भारत- पाक संबंध सुधारण्यासाठी चीन रचनात्मक भूमिका स्वीकारेल. गेंग म्हणाले की, आर्थिक कॉरिडॉर आणि काश्मीर मुद्द्याचा काहीच संबंध नाही.  
 
लेख आणि वक्तव्यांत विरोधाभास  
सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे ग्लोबल टाइम्स हे अधिकृत वृत्तपत्र आहे. या क्षेत्रात चीनची महत्त्वाची भूमिका राहील असे लेखात लिहिले होते. रोहिंग्या शरणार्थींच्या मुद्द्यावर चीनने म्यानमार आणि बांगलादेशादरम्यान मध्यस्थी केली. इतर देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप न करण्यावर चीनचा परराष्ट्र धोरणाचा कटाक्ष असतो. मात्र ‘वन बेल्ट वन रोड ’ योजनेत आलेल्या देशांमध्ये चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता भारत-पाक क्षेत्रीय विषयातदेखील चीन हस्तक्षेप करेल असे यात लिहिले आहे.  
 
जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना 
वन बेल्ट वन रोड ही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याद्वारे चीन आशिया, आफ्रिका आणि  युरोपला जोडू इच्छितो. यात अनेक रेल्वे स्थानके, रस्ते आणि ऊर्जा केंद्रांची निर्मिती सुरू आहे.  
 
मोदींचा होता आक्षेप 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्या समक्ष या मुद्द्यावर आक्षेप घेतला होता. काश्मीरच्या गिलगिट, बाल्टिस्तानमधून चीन-पाक कॉरिडॉरचा मार्ग जातो. या प्रदेशावर भारताने आपला दावा सांगितला आहे. या क्षेत्रात चीन आैद्योगिक  पार्क, औष्णिक ऊर्जा केंद्र, रेल्वे लाइन, रस्ते बांधत आहे. यात काराकोरम महामार्गाचा विस्तारही चीनच्या अशांत असलेल्या शिजिआंग प्रांतापर्यंत जाणार आहे. काश्मीर खोऱ्यापर्यंत यामुळे जलदगती पोहोच निर्माण होईल. पाकिस्तानपर्यंत रेल्वे लाइन व रस्ते तयार झाल्यास ग्वादर, पासनी, आेरमारामधील चिनी नौदल स्थानकाहून  कार्गो केवळ ४८ तासांत पाकला पोहाेचू शकतील. 
 
साशंकता पसरवण्याचा भारताचा प्रयत्न; चिनी माध्यमांचा आरोप 
बीजिंग -
 दक्षिण अाशियायी देशांमध्ये भारत हेतुपुरस्सर चीनच्या भूमिकांविषयी साशंकता निर्माण करत आहे, असा आरोप चिनी माध्यमांनी केला. बीजिंग आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत असून भारत प्रत्येक योजनेविषयी साशंकता निर्माण करतो. दक्षिण अाशियन देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवण्यास चीन जबाबदार आहे, अशी भूमिका भारतीय माध्यमांनी घेतली होती. याचे खंडन चिनी माध्यमांनी केले. भारताची ही आर्थिक विश्लेषणे नकारात्मक असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. ‘चीन छुप्या सापासारखा’ असे वर्णन भारतीय माध्यमे करत असल्याने चीनच्या वृत्तपत्राने या सर्व लेखांचे खंडन केले आहे. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...