आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मिरी दहशतवाद्यांना मी मॅनेज केले : परवेझ मुशर्रफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद  - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी दावा केला की त्यांच्या सरकारने काश्मीरमधील दहशतवाद्यांची (काश्मीरचे स्वातंत्र्यसैनिक असा उल्लेख मुशर्रफ यांनी केला आहे.) मनधरणी करून त्यांना नियंत्रणात ठेवले होते.
 
काश्मीर प्रश्नातून तोडगा काढण्याचा मार्ग केवळ राजकीयच असू शकतो, असे त्यांना नंतर वाटले. त्यामुळे त्यांनी भारताला चर्चेसाठी राजी केले. त्यांनी म्हटले की त्यापूर्वी भारत कधीच काश्मीरविषयी चर्चा करण्यास राजी नव्हता. मुशर्रफ यांनीच आपल्या कार्यकाळात काश्मीरच्या दहशतवाद्यांसाठी ‘काश्मीरचे स्वातंत्र्यसैनिक’ हा शब्द प्रचलित केला होता. 
 
मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून लावली आणि सत्तासूत्रे हाती घेतली होती. ते वर्ष २००१ ते २००८ पर्यंत सत्तेत होते. गेल्या वर्षी त्यांना परदेशगमनाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर मार्च २०१६ मध्ये ते दुबईला गेले.
 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, ‘ मी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष असताना भारताला चर्चेसाठी राजी करत होतो. ते राजीही झाले. त्यापूर्वी भारत यासाठी कधीच तयार झाला नव्हता.’
  
मुशर्रफ यांनी सांगितले की, अफगाणिस्तानची गुप्तचर यंत्रणा आणि राष्ट्रीय सुरक्षा विभाग केवळ भारताच्या हातातले बाहुले होते. ते पाकिस्तानमधल्या दहशतवादी गटांना सुविधा पुरवत. पाकमध्ये आज जो दहशतवाद बोकाळला आहे त्यास भारताची रणनीती जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
पाकिस्तान सरकारने पूर्वी शांत असलेल्या पंजाब  राज्यात दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी काय केले, असा प्रश्न मुशर्रफ यांनी मुलाखतीदरम्यान उपस्थित केला. त्यांनी सध्याच्या पाक सरकारवरही दहशतवाद निर्मूलनात अपयशी ठरल्याची टीका केली. आपण सत्तेतून गेल्यानंतरच पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढले, असा दावा मुशर्रफ यांनी केला.  
 
झर्ब-ए-अब्ज यशस्वी ठरणार  
उत्तर वजिरीस्तानमध्ये असलेले दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी पाक लष्कराने झर्ब-ए-अब्ज मोहीम हाती घेतली आहे. याला यश येणार, असा विश्वास मुशर्रफ यांनी व्यक्त केला. भारतीय हेरसंस्था या दहशतवाद्यांना रसद पुरवत आहे, असा आरोप त्यांनी केला. मात्र पाक येथील दहशतवाद्यांचे उच्चाटन करेल.  
 
हाफिज सईद दहशतवादी नाही, भारत अपप्रचार करत आहे  
माजी लष्करप्रमुख आणि हुकूमशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या मते, मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा सूत्रधार हाफिज सईद दहशतवादी नाहीच. भारत त्याचा पिच्छा पुरवत आहे. तो दहशतवादी असल्याचा अपप्रचार भारत करत आहे. हाफिजचे समर्थक भारतीय सैन्याशी लढण्यास काश्मीरला जातात. त्यामुळे भारत त्याला दहशतवादी ठरवू इच्छित आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानने हाफिज  सईदला दहशतवादी घोषित केले होते.
बातम्या आणखी आहेत...