आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन पहिल्यांदाच बनवणार बाॅल पाॅइंट पेनची टिप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - बॉल पाॅइंट पेनची टिप दिसायला खूपच साधारण वाटत असली तरी ती बनवणे खूपच अवघड काम आहे. इतके अवघड की अंतराळात रॉकेट पाठवणारा, बुलेट ट्रेन चालवणारा आणि जगातील अर्धे लोखंड आणि स्टील उत्पादन करणारा चीनदेखील याला आतापर्यंत बनवू शकला नाही. चीनमध्ये बॉल पॉइंटची टिप बनतच नाही असे नाही. येथेही टिप बनतात. मात्र, त्यांची गुणवत्ता खराब असते. वर्षभरापूर्वी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनीदेखील राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर चांगल्या गुणवत्तेची टिप बनवण्यात यश मिळाले नसल्यामुळे खेद व्यक्त केला होता. सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या पेन टिप आपल्याला जर्मनी, स्वित्झर्लंड आणि जपानमधून आयात कराव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितले होते.   

वास्तविक बॉल पाॅइंट पेन बनवण्यासाठी चांगल्या गुणवत्तेची मशिनरी आणि अत्यंत कठोर मात्र एकदम पातळ स्टील प्लेटची आवश्यकता असते. ही गुणवत्ता असलेले स्टील चीन बनवतच नाही. त्यामुळे येथे तयार करण्यात आलेल्या टिपची गुणवत्तादेखील खराब असते. चीनमध्ये पेन बनवणाऱ्या सुमारे ३,००० कंपन्या आहेत. मात्र, या कंपन्या दरवर्षी सुमारे सव्वाशे कोटी रुपयांच्या टिप आयात करतात.   
चीनची सार्वजनिक क्षेत्रातील “ताइयुआन आयर्न अँड स्टील’ कंपनीने या समस्येचे समाधान शोधले असल्याचा दावा केला आहे. ही कंपनी पाच वर्षांपासून या टिप बनवण्यावर संशोधन करत होती. चांगली गुणवत्ता असलेली टिप बनवली असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. या टिपपासून आता पेन बनवता येतील. आधी या टिपचे लॅबमध्ये परीक्षण होणार अाहे. यामध्ये ही टिप पास झाल्यास शक्यताे दोन वर्षांतच चीन टिप आयात करणे बंद करेल.   
बाॅल पाॅइंट पेन बनवणे हा कोणत्याही देशासाठी मोठा मुद्दा ठरू शकत नाही. मात्र, चीनने २०२५ पर्यंत हाय-टेक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉल पाॅइंट पेनदेखील याचाच एक भाग आहे. प्रिसिजन इंजिनिअरिंगमध्ये चीनला युरोप आणि जपानपेक्षा मागास मानले जाते. जगभरात उत्पादन होणाऱ्या एकूण स्टीलपैकी अर्ध्या स्टीलचे उत्पादन चीनमध्येच होते. मात्र, चीनला हाय-ग्रेड स्टील आयात करावे लागते. इतकेच नाही तर हाय एंड कॉम्प्युटर चिप्सदेखील जपान तसेच तैवानमधून आयात कराव्या लागतात.   
 
भारतही करतो आयात   
याबाबत भारत चीनपेक्षा थोडा वरचढ आहे. बॉल पाॅइंट बनवणारी दिल्लीतील कंपनी ब्लेसिंग ओव्हरसीजच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतात बनणाऱ्या टिप चीनपेक्षा चांगल्या गुणवत्तेच्या असतात. मात्र, सर्वोत्तम गुणवत्ता असलेल्या टिप स्वित्झर्लंड आणि जर्मनीमधून आयात केल्या जातात.