आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशिया,उत्तर कोरियाने आता परस्परांच्या नागरिकांना रोखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर  - उत्तर कोरिया व मलेशियाने परस्परांच्या नागरिकांना मायदेशी जाण्यास मज्जाव केला आहे. आता मलेशियातील उत्तर कोरियाचे नागरिक मलेशिया सोडू शकणार नाहीत आणि उत्तर कोरियातील मलेशियन नागरिकांना देश सोडता येणार नाही. मलेशियात उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांचे सावत्र भाऊ किम जाँग नाम यांच्या हत्येनंतर वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. त्यातच दोन्ही देशांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.  

दोन्ही देशांनी परस्परांच्या राज दूतांना पहिल्यांदाच हाकलून लावले आहे. वास्तविक मलेशिया व उत्तर कोरियाचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण राहिले आहेत. १९७० च्या दशकापासून दोन्ही देशांत चांगले संबंध राहिले आहेत. उत्तर कोरियाने २००३ मध्ये क्वालालंपूरमध्ये राजदूत कार्यालय सुरू केले होते. परंतु या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी क्वालालम्पूर विमानतळावर किम जाँग नाम यांच्या हत्येनंतर उभय देशांत कटुता आली. मलेशियातील प्रसारमाध्यमांनी हत्येमागे उत्तर कोरियाच्या सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. त्यावर उत्तर कोरियाने जोरदार टीका केली. या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपीस उत्तर कोरियाला सोडून द्यावे लागले आहे. तपासात जाँग-नामला व्ही एक्स नर्व्ह एजंट हे विष देण्यात आले होते, असे निष्पन्न झाले होते. हत्येप्रकरणी एका महिलेला अटक झाली होती. तिने हे कृत्य करण्यासाठी ९० डॉलर मिळाल्याची कबुली दिली होती. हा टीव्ही कार्यक्रमाचा भाग असल्याचे सांगितले गेल्याचा दावाही तिने केला होता.  
 
क्षेपणास्त्रासंबंधी परिषदेची आज होणार बैठक, कारवाईची शक्यता
संयुक्त राष्ट्र - उत्तर कोरियाने सोमवारी घेतलेल्या चार क्षेपणास्त्रांच्या चाचणीनंतर आंतरराष्ट्रीय समुदाय चिंतीत आहे. त्यामुळेच बुधवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलावली आहे. संयुक्त राष्ट्र व जपानने केलेल्या विनंतीनंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरिस यांनी या चाचणीचा निषेध केला आहे. उत्तर कोरियाची ही कृती संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. त्यानुसार कोरियाला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकसित करता येणार नाही, असे म्हटले आहे. परंतु संयुक्त राष्ट्राच्या नियमांना न जुमानता चार क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. जग अशा कृतीला कधीही परवानगी देऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या राजदूत निक्की हेले यांनी ट्विटरवरून म्हटले होते. 
 
कायद्याचा काय आधार?  
संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क विषयक जाहीरनाम्यातील कलम १३ नुसार प्रत्येक व्यक्तीला मायदेशी किंवा कोणत्याही देशात जाण्याचे स्वातंत्र्य आहे. मलेशिया या संबंधीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. परंतु उत्तर कोरियाने स्वाक्षरी केलेली नाही. ताजे निर्बंध व्हिएन्ना कराराचे उल्लंघन ठरते.  

कोठे किती नागरिक अडकले   
उत्तर कोरियात मलेशियाचे ११ मुत्सद्दी अडकले आहेत. संयुक्त राष्ट्राच्या भोजन कार्यक्रमात दोन मलेशियन आहेत. मलेशियात सुमारे १ हजारावर उत्तर कोरियाचे नागरिक आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत मलेशियात येणाऱ्या उत्तर कोरियाच्या नागरिकांना व्हिसाची गरज नव्हती.
 
बातम्या आणखी आहेत...