आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान, फुटीरवाद्यांनी उधळली शांतता प्रक्रिया, मेहबूबा मुफ्ती यांचा जम्मू-काश्मीर विधानसभेत आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पाकिस्तान आणि फुटीरवादी नेते जम्मू आणि काश्मीरमधील शांतता प्रक्रियेला सुरुंग लावत आहेत.  शांतता प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळालाही त्यांनी आपली दारेच बंद केली आहेत, असा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी राज्य विधानसभेत केला. आता तरी फुटीरवाद्यांनी आपले दरवाजे चर्चेसाठी खुले केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.    

मेहबूबा म्हणाल्या की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पठाणकोट अतिरेकी हल्ल्याची पार्श्वभूमी असताना लाहोरला गेले. त्यानंतर अनेक वरिष्ठ नेतेही फुटीरतावाद्यांच्या दरवाजापर्यंत बोलण्यासाठी गेले होते. संपूर्ण देशाचे डोळे त्यांच्यासह पाक व फुटीरवाद्यांच्या भूमिकेकडे लागलेले असताना द्विपक्षीय वा सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी चर्चेची ही दारे बंद करणे शांतता प्रक्रियेत हेतुतः बाधा आणण्यासारखेच आहे.  एवढ्या दीर्घकाळच्या अशांततेनंतर तरी फुटीरवाद्यांनी चर्चेसाठी दारे उघडली पाहिजेत. यामुळे बोलणी, चर्चा तरी सुरू होईल. काश्मीरची ही कोंडी सोडवण्यासाठी कुणी काय पावले उचलली? काय केले आहे? असा प्रश्न त्यांनी शेवटी विचारला.

सुरक्षा दलांना बोल लावणे सोपे : सुरक्षा दलांनी हा हिंसाचार रोखावा असे आपण म्हणतो. पण ते तेवढे सोपे नाही. कारण समूह हल्ला करतो तेव्हा त्यांच्याकडे पेट्रोलबॉम्ब, दगड आणि कुऱ्हाडी घेतलेले असतात. शिवाय मुले व महिलांना ते पुढे करतात. यामुळे सुरक्षा दलांना बोल लावणे सोपे असते. परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. 
 
अशांतता हा सुनियोजित कटाचाच भाग 
खोऱ्यातील अशांततेचा संदर्भ देत मेहबूबा म्हणाल्या की, यामुळे अनेक युवकांचा मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. त्यामुळे दीर्घकाळचा खोऱ्यातील हिंसाचार, अशांतता हा एक सुनियोजित कटाचाच भाग आहे. दीर्घकाळच्या अशांततेनंतरही पाकिस्तान व फुटीरवादी यांना जे हवे ते काही साधता आलेलेच नाही. त्यामुळे हा मार्ग त्यांनी सोडून चर्चेत, बोलणीत सहभागी व्हावे.